खानापूर ते अनमोड दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्र. एनएच 4 ए या रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम पूर्ण करण्याच्या बाबतीत कंत्राटदाराकडून होत असलेला विलंब आणि बेजबाबदारपणा याबद्दल या भागातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कंत्राटदार बेपत्ताच झाल्यामुळे संतप्त ग्रामस्थ ‘या रस्त्याचा कंत्राटदार हरवला आहे’ अशी जाहिरात करण्याच्या विचारात आहे.
खानापूर ते अनमोड दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्र. एनएच 4 ए या रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम गेल्या कांही महिन्यांपासून ठप्प झालेल्या अवस्थेत असल्यामुळे या मार्गावरील गावांमध्ये असलेल्या ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली आहे. खरेतर मान्सून पूर्वी म्हणजे पावसाळा सुरू होण्याआधी या रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते.
मात्र कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे हे काम रखडल्याने ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनासह गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे तक्रार करताना बेळगाव आणि धारवाडला प्रवास करणाऱ्या गोव्यातील लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सदर रस्त्याचे दुपदरीकरण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण व्हावे यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जाब विचारण्याची विनंती केली आहे.
बेळगाव ते खानापूर या 30 कि. मी. अंतराच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा 1395.38 कोटी रुपयांचा प्रकल्प आणि खानापूर ते अनमोड हा रामनगर मार्गे जाणारा 52 कि. मी. अंतराच्या रस्त्याच्या दुपदरीकरणाचा 503.22 कोटी रुपयांचा प्रकल्प, हे दोन प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 4 वर्षांपूर्वी मंजूर केले आहेत. यापैकी बेळगाव ते खानापूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. याउलट खानापूर ते अनमोड या रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम मात्र अद्यापही अर्धवट अवस्थेत निसर्गाच्या स्वाधीन पडून आहे. सदर रस्त्याच्या मूळ कंत्राटदाराने मोठे नुकसान सहन करावे लागल्यामुळे गेल्यावर्षी या रस्त्याचे काम अर्धवट सोडून दिले. त्यानंतर पुन्हा निविदा काढून सदर रस्त्याचे काम पुणे येथील एका कंपनीला देण्यात आले. तथापि या रस्त्याच्या कांही भागांचे दुपदरीकरण झालेलेच नाही. तसेच अनेक पुलांचे काम अर्धवट अवस्थेत आहे. परिणामी खानापूर ते अनमोड पर्यंतचा हा रस्ता पावसाळ्यात अधिकच धोकादायक बनण्याची शक्यता आहे.
सदर रस्त्याच्या दुपदरीकरणाचे कंत्राट मिळाल्यानंतर पुणे येथील संबंधित कंपनीने भूमिपूजन करून प्रारंभी धडाक्यात कामाला सुरुवात केली होती. कामाचा हा झपाटा पाहता मार्च 2023 पर्यंत खानापूर ते अनमोड रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम पूर्ण होईल, असे सर्वांना वाटत होते. मात्र मध्यंतरी अचानक हे काम थांबले असून कामगार आणि यंत्रसामुग्री गायब झाली आहे, अशी माहिती या मार्गावरील रहिवासी निखिल असूकर यांनी दिली.
तसेच पावसाळ्यापूर्वी जर या रस्त्याचे अर्धवट अवस्थेत असलेले दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाले नाही तर खानापूर ते अनमोड दरम्यान पावसाळ्यात प्रचंड मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते, असे स्पष्ट करून संबंधित कंत्राटदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचा निषेध नोंदवण्यासाठी या भागातील ग्रामस्थ सदर रस्त्याच्या दुतर्फा ‘या रस्त्याचा कंत्राटदार हरवला आहे’ अशी जाहिरात करण्याच्या विचारात आहेत, अशी माहिती असूकर यांनी दिली.