Friday, March 29, 2024

/

‘हे’ निसर्गरम्य वनक्षेत्र लवकरच ट्रेकिंगसाठी होणार खुले

 belgaum

बेळगाव तालुक्यातील धामणे (एस) – तिलारी परिसर हा जंगल प्रदेशाने व्यापला असून निसर्गप्रेमी आणि पर्यटकांना या वनक्षेत्राचा आनंद लुटता यावा यासाठी वनखात्याने परवानगी दिली असून लवकरच निसर्गप्रेमींना धामणे (एस) -तिलारी वनक्षेत्रात वनखात्याने सर्वेक्षण केलेल्या ट्रेकिंग मार्गावरून मनमुराद फिरून ट्रेकिंग करता येणार आहे.

धामणे (एस) -तिलारी वनक्षेत्रातील 10 ते 15 कि. मी.चा परिसर हा धबधबे, खळखळणारे नाले आणि हिरवळीसह जैवविविधतेने नटलेला आहे. या सर्वाचा आनंद निसर्गप्रेमींना पदभ्रमंती दरम्यान घेता येणार आहे. वनक्षेत्रात भटकंती दरम्यान वनसंपदे बरोबरच वन्य प्राणी, विविध पक्षी, प्रवाहीत झालेले नाले, उंचावरून पडणारे धबधबे याचा अनोखा अनुभव घेता येणार आहे. निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींना धामणे (एस) परिसरातील वनक्षेत्रात फिरून अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. वनक्षेत्रात असलेल्या जैवविविधतेचा जवळून अभ्यास करता येणार आहे. या सर्व गोष्टीमुळे निसर्गप्रेमीमध्ये देखील ट्रेकिंगसाठी धामणे (एस) आकर्षणाचे केंद्र झाले आहे.

पूर्वी या वनक्षेत्रात ट्रेकिंगसाठी परवानगी नव्हती. मात्र आता वनखात्याने ट्रेकिंगसाठी हिरवा कंदील दाखवल्याने वन्यप्रेमी निसर्गप्रेमी आणि पर्यटकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. कर्नाटक पर्यावरण स्नेही पर्यटन (इको-टुरिझम) विकास मंडळाने या वनक्षेत्राची पाहणी करून पर्यटकांच्या सुविधांसाठी वनक्षेत्रात 40 जणांची नेमणूक केली आहे. या सर्व वनरक्षकांना वनक्षेत्राबाबत सर्व प्रशिक्षण घेऊन सज्ज करण्यात आले आहे. धामणे येथील वनक्षेत्राचे सर्वेक्षण करण्याबरोबरच वनखात्याने ट्रेकिंगसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी गाईडही नेमले आहेत. सदर ट्रेकिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी 250 रुपये शुल्क आकारणी केली जाणार आहे. दरम्यान, कोरोना काळात अनेक जण खरी बंदिस्त होऊन निराश झाले आहेत, अशा नागरिकांमध्ये ट्रेकिंगमुळे उत्साह आणि चैतन्य निर्माण होणार आहे. नागरिकांना जंगल भटकंतीची संधी मिळणार असून हिरवाईने नटलेल्या निसर्गाच्या सानिध्यात फिरता येणार असल्याचे बेळगावचे मुख्य वनसंरक्षण अधिकारी विजयकुमार सालीमठ यांनी स्पष्ट केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.