आपल्या शेजारील महाराष्ट्र व केरळ राज्याच्या तुलनेत कर्नाटकातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. तेंव्हा वीकेंड लाॅक डाऊन करण्याऐवजी राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टिकोनातून राज्याच्या सीमा ‘सील’ करून राज्यांतर्गत व्यापार, वाणिज्य आणि उद्योग क्षेत्राला चालना दिली जावी, अशी मागणी द बेळगाव ट्रेडर्स फोरमने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
द बेळगाव ट्रेडर्स फोरमने बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नांवे जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी निवेदनाचा स्वीकार करून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तुमच्या नेतृत्वाखाली राज्यातील व्यापार, वाणिज्य आणि औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास होईल आणि यशाची नवी शिखरे गाठली जातील याचा आम्हाला विश्वास आहे.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचे व्यवस्थापन कर्नाटक राज्याने समर्थपणे केले आहे. तथापि कोरोना आणि लाॅक डाऊनच्या उपाययोजनांमुळे व्यापार, वाणिज्य आणि औद्योगिक क्षेत्राची मोठी आर्थिक हानी झाली आहे. सध्या शेजारील महाराष्ट्र व केरळ राज्याच्या तुलनेत आपल्या राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणाखाली आहे.
तेंव्हा विकेंड लॉकडाऊन करण्याऐवजी राज्याच्या सीमा सील केल्या जाव्यात, त्याची कठोर अंमलबजावणी केली जावी. हे करताना राज्यांतर्गत व्यापार, वाणिज्य आणि औद्योगिक क्षेत्राला पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्यास मुभा दिली जावी. जेणेकरून व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांसह राज्याची अर्थव्यवस्था पुनश्च बळकट होण्यास मदत होईल. थोडक्यात राज्याच्या सीमा सील डाऊन करून राज्याला आर्थिक दृष्ट्या कार्यरत केले जावे, अशा आशयाचा तपशील मुख्यमंत्र्यांना धाडण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतेवेळी सतीश तेंडुलकर यांच्यासह शेवंतीलाल शाह, विकास कलघटगी, राजू खोडा, रमेश पावले, अरुण कुलकर्णी, दीपक अवर्सेकर, विशाल कुलकर्णी, रमेश पावले आदी उपस्थित होते.