Friday, April 26, 2024

/

बिम्स संचालक धास्तीकोप्प दीर्घ रजेवर

 belgaum

बेळगाव शहरातील बीम्स (सिव्हिल) हॉस्पिटलला मुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी नुकतीच भेट देऊन तेथील कारभारावर ताशेरे ओढल्यानंतर मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा लवकरच बीम्सला भेट देण्यास येणार आहेत. या पार्श्वभूमीवर बीम्सचे संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प अचानक दीर्घ रजेवर गेल्याने उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे.

शहरासह जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्ण तसेच अन्य रुग्णांवर बीम्स हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित उपचार केले जात नसल्याच्या तक्रारी वाढल्याने उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी नुकतीच या हॉस्पिटलला भेट देऊन तेथील गैरकारभाराबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली होती. तसेच उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या वार्ड बाहेर कोरोना बाधित रुग्णाचा मृतदेह ठेवल्याची बाब गांभीर्याने घेतली होती. एकीकडे कोरोना बाधितांवर उपचार सुरू असताना त्यांच्या शेजारीच मृतदेह का ठेवला? मृतदेह ठेवल्यामुळे बाधितांच्या मनावर परिणाम होणार नाही का? असा प्रश्न उपस्थित करून सवदी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून त्यांचे कान उपटले होते.

बीम्सच्या प्रशासनात समन्वय नाही. सर्वत्र सावळागोंधळ आहे. येथील अधिकारी आपल्याच विश्वात दंग आहेत. त्यांना त्यांच्या विश्वातून बाहेर काढतो, अशी तंबी त्यावेळी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी दिली होती. यानंतर सोमवारी सायंकाळी बीम्सचे जिल्हा सर्जन डॉ. हुसेनसाब काजी यांनी 7 परिचारिकांना कर्तव्यात कसूर केल्यावरून सेवा मुक्त केले आहे.

 belgaum

सेवामुक्त करण्यात आलेल्या परिचारिकांनी यात आपला नव्हे तर डॉक्टरांचा दोष असल्याचे सांगून सध्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा येत्या 4 जून रोजी बेळगाव दौऱ्यावर येत असून ते हॉस्पिटलला भेट देण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बीम्सचे संचालक विनय दास्तीकोप्प यांनी मात्र दीर्घ रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यांनी 1 महिन्याची दीर्घ रजा मागणारे पत्र वैद्यकीय शिक्षण खात्याच्या मुख्य सचिवांना लिहिले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या गैरहजेरीत बीम्सच्या शरीरशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. उमेश कुलकर्णी बीम्सच्या संचालक पदाचा कार्यभार सांभाळतील असेही आपल्या पत्रात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.