Friday, March 29, 2024

/

जिल्हा रुग्णालय की मृत्यूचे माहेरघर?- युवकाने भावाच्या मृत्यूला इस्पितळाला धरले जबाबदार

 belgaum

बेळगाव जिल्हा रुग्णालयात औषध उपचार करण्यास दिरंगाई आणि दुर्लक्ष केले जात असल्यामुळे येथे मृत्यू पावणाऱ्याची संख्या देखील मोठी असून हे रुग्णालय म्हणजे मृत्यूचे माहेरघर बनल्याचा आरोप करण्याबरोबरच प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जिल्हा रूग्णालयात चाललेला गैरप्रकार व रुग्णांची हेळसांड थांबवावी, अशी जोरदार मागणी मारुती भोसले या मंडोळी  येथील  युवकाने केली आहे

सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. ऑक्सिजन अभावी रुग्णांचे हाल होत आहे. त्याचप्रमाणे रुग्णांच्या नातेवाईकांना देखील मोठ्या प्रमाणात धावपळ करावी लागत आहे. ऑक्सीजन मिळाला नसल्याने कांही रुग्णांना आपले जीव गमवावे लागला आहे. ही बाब खरी आहे, पण जिल्हा रुग्णालयातील प्रकार मात्र वेगळाच आहे. या ठिकाणी मुळात रुग्णांची देखभालच व्यवस्थित केली जात नाही. तसेच औषध उपचार करण्यास दिरंगाई आणि दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात मृत्यू पावणाऱ्याची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. रुग्णालयात दररोज 10 ते 15 रुग्णांचा कोरोनामुळे जीव जात आहे. तथापी सरकारी आकडा पाहता दोन किंवा तीन मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात येत आहे. प्रत्यक्षात सरकारी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना याबाबत विचारणा केली असता रुग्णालयातील बेजबाबदारपणा चव्हाट्यावर येऊ लागला आहे.

मारुती यानें याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, माझ्या मोठ्या भावाला कोरोनाची लागण झाली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणी केली असता कोरोनाचा स्कोर केवळ 9 होता. त्यामुळे माझ्या परिचयातील डॉक्टरांना विचारणा केली असता. त्यांनी जिल्हा रुग्णालयात व्यवस्थित उपचार करण्यात येतात. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात भावाला दाखल कर, असा सल्ला दिला. माझा मोठा भाऊ बाबू भरमा भोसले यांना जिल्हा रुग्णालयात केल्यानंतर पहिल्या दिवशी लागलीच काळजी घेऊन औषधे देण्यास प्रारंभ करण्यात आले. त्यामुळे माझा भाऊ बरा होईल ही अपेक्षा वाढली. पण दुसऱ्या दिवशीपासून रुग्णाकडे पाहण्यासाठी किंवा विचारण्यासाठी वैद्यकीय अधिकारी फिरकलेच नाही. पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे चार दिवसानंतर माझ्या भावाची तब्येत खूपच खालावली. परिणामी भावाला खाजगी रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र तोपर्यंत बराच वेळ झाला होता, जिल्हा रुग्णालयातील दुर्लक्षामुळे माझ्या भावाची तब्येत खूपच खालावली होती. खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जीवाची हमी दिली नाही, तरीदेखील औषधोपचार करण्यासाठी पावले उचलली. तथापि दुर्दैवाने माझा भाऊ वाचू शकला नाही. Maruti bhosle

 belgaum

माझ्यासारखी वेळ इतर कुणावरही येऊ नये, अशी माझी अपेक्षा आहे. ज्या अपेक्षेने जिल्हा रुग्णालयात भावाला दाखल केले होते. त्या अपेक्षेवर तेथील डॉक्टर व स्टाफने पूर्णपणे पाणी फेरले असे सांगून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच माझ्या भावाचा जीव गेला आहे असा स्पष्ट आरोप भोसले यांनी केला आहे. जिल्हा रुग्णालय म्हणजे अक्षरशा घाणीचे साम्राज्य आहे. स्वच्छता नाही , सामाजिक अंतर नाही, तसेच रुग्णांवर उपचार करण्यासाठी म्हणावी तशी काळजी घेतली जात नाही. आज जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच कोरोना बाधितांचा मृत्यू होत आहे. मागील वर्षीची परिस्थिती पाहता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला प्रत्येक रुग्ण बरा होऊन घरी परतला होता. पण ही परिस्थिती सध्या नाही. कारण याला जबाबदार जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आहेत. रुग्णाची परिस्थिती पाहून औषध उपचार करणे गरजेचे आहे. पण याचे गांभीर्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना नसल्याचे दिसून आले आहे. व्यवस्थित औषध उपचार करण्याकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून जिल्हा प्रशासनाने तसेच राज्य शासनाने याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे, असे भोसले म्हणाले.

जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे मृत्यू होण्यास केवळ ऑक्सिजनचा तुटवडा हे कारण नसून मृत्यूचे प्रमाण वाढण्यास जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारीदेखील तितकेच जबाबदार आहेत. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करता जिल्हा रुग्णालयातील चाललेला प्रकार गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

जे वैद्यकीय अधिकारी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हावी. तसेच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची काळजी घेण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपायोजना राबवाव्यात. रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्याला संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार ठरवावे, अशी मागणीही भोसले यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.