Thursday, April 25, 2024

/

सिद्धिविनायक स्पोर्टस क्लबने सुरू केलाय ‘हा’ स्तुत्य उपक्रम

 belgaum

सध्याच्या कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनच्या काळात शिवशक्तीनगर अनगोळ येथील सिद्धिविनायक स्पोर्टस क्लब समाजातील गरजू आणि दीनदुबळ्यांच्या मदतीला धावून आला असून या क्लबतर्फे ‘एक घास आपुलकीचा, एक घास माणुसकीचा’ या घोषवाक्याखाली मोफत भोजन वाटपाचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

शिवशक्तीनगर अनगोळ येथील सिद्धिविनायक स्पोर्टस क्लबतर्फे गेल्या दोन दिवसांपासून अनगोळ -टिळकवाडी भागातील जेवणाची आबाळ होणाऱ्या गरजू कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी आणि रस्त्यावरील गरीब असहाय्य भिक्षुकांसाठी दुपारचे एक वेळचे भोजन मोफत पुरवण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सध्या प्रारंभी डाळ -भात आणि पाण्याची बाटली असे या भोजनाचे स्वरूप आहे.

सदर उपक्रमांतर्गत दुपारच्या सत्रात गरजू रुग्णांना घरपोच भोजन पोहोचविले जाते. त्याचप्रमाणे अनगोळ ते चौथ्या रेल्वेगेट मार्गे उद्यमबागपर्यंत आणि खानापूर रोड, ग्लोब टॉकीज रोड, कॉलेज रोड, चन्नम्मा सर्कलमार्गे मध्यवर्ती बस स्थानकापर्यंत, तेथून पाटील गल्ली शनी मंदिर मार्ग रेल्वे स्टेशनपर्यंत रस्त्यावर जे कोणी भिक्षुक दिसतील त्यांना सिद्धिविनायक स्पोर्टस क्लबचे कार्यकर्ते भोजनाची पाकिटं आणि पाण्याच्या बाटलीचे वाटप करण्याचे कार्य करत आहेत. सदर उपक्रमांतर्गत सध्या जवळपास 70 लोकांना दररोज मोफत भोजन पुरविले जात आहे.Angol

 belgaum

माजी नगरसेवक विनायक गुंजेटकर यांचे मार्गदर्शन आणि सहकार्याने सुरू असलेला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लबचे भावेश बिर्जे, विश्वनाथ पवार, प्रसाद मुतगेकर, पंचू मुतगेकर, प्रतीक कुट्रे, प्रतीक शिंदे, विघ्नेश गुंजेटकर, यशराज, विनायक मन्नोळकर आदींसह सुमारे एक 15 -20 कार्यकर्ते दररोज परिश्रम घेत आहेत.

दरम्यान सध्याच्या कोरोना काळात अनगोळ आणि टिळकवाडी भागातील जेवणाची गैरसोय होत असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांसह ज्या गरजू व्यक्तींना जेवणाची गरज असेल त्याने विनायक गुंजेटकर (9448078155) अथवा राजू पवार (9449691602) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.