Friday, April 26, 2024

/

महापंचायत शेतकऱ्यांच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावेल : शेतकरी नेते

 belgaum

राष्ट्रीय किसान मोर्चा, कर्नाटक राज्य रयत संघ आणि विविध शेतकरी संघटनांतर्फे बेळगावात आयोजित शेतकरी महापंचायत अर्थात महासभा केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी काळ या कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास बेळगावच्या शेतकरी नेत्यांनी व्यक्त केला आहे.

एकीकडे बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे शहरातील सीपीएड कॉलेज मैदानावर आज दुपारी 2 वाजता शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्याबरोबरच अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या महापंचायतीचे अर्थात महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात महापंचायत स्थळी बेळगाव लाईव्हने स्थानिक शेतकरी नेत्यांची संवाद साधला असता त्यांनी उपरोक्त विश्वास व्यक्त केला. शेतकरी महापंचायत आयोजनाचा उद्देश स्पष्ट करताना शेतकरी नेते प्रकाश नाईक यांनी केंद्र व राज्य सरकारने लागू केलेले अन्याय शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेतले जावेत, या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी ही पंचायत भरवण्यात आली आहे. केंद्र सरकारचे 3 काळे कायदे आणि राज्य सरकारचे 5 काळे कायदे हे शेतीला मारक आहेत. लोकशाहीला, पुढच्या पिढीला आणि संपूर्ण कृषी व्यवस्थेला मारक आहेत असे सांगून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा झाल्यानंतर आता हा दुसरा स्वातंत्र्याचा लढा आम्ही करत आहोत असे नाईक यांनी सांगितले. त्याचप्रमाणे बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकी संदर्भात बोलताना आम्हाला या निवडणुकीशी देणेघेणे नाही. काँग्रेस असो वा भाजप असो. हे एकाच पद्धतीचे लोक आहेत. दोघांनीही शेतकऱ्यांच्या विरोधात काम केले आहे. आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नाही. मात्र जे शेतकऱ्यांबरोबर आहे त्यांना तुम्ही पाठिंबा द्या असे आवाहन आम्ही करणार आहोत असेही प्रकाश नाईक यांनी स्पष्ट केले.

शेतकरी नेते राजू मरवे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रमुख नेते राकेश टिकैत, यदुवीर सिंग, दर्शनपाल, महाराष्ट्रातील शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी, माजी केंद्रीय मंत्री बाबागौडा पाटील आदी मान्यवरांसह जिल्हा आणि संपूर्ण राज्यातील शेतकरी नेते या महापंचायतीला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. या महासभेला शेतकरी हजारोच्या संख्येने हजेरी लावून केंद्र आणि राज्य सरकारने लागू केलेले काळे कायदे ताबडतोब मागे घेण्याची मागणी करणार आहेत असे सांगून ही शेतकरी महापंचायत अर्थात महासभा केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी काळ्या कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मरवे म्हणाले.

 belgaum

गेल्या 70 वर्षात काँग्रेसने आमच्यावर जेवढा अन्याय केला नाही तेवढा या भाजप सरकारने गेल्या 7 वर्षात केला आहे. भाजपने शेतकऱ्यांना मातीमोल केले आहे. देशातील शेतीसह सर्व व्यवसायांचे खाजगीकरण करून शेतकऱ्यांचा सत्यानाश करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, असे परखड मत व्यक्त करून या षड्यंत्राचा मूठमाती देण्याच्या हेतूने आजही शेतकरी महापंचायत अर्थात महासभा बेळगाव -कर्नाटकात होत आहे, असेही राजू मरवे यांनी स्पष्ट केले. आजच्या महासभेमध्ये हलगा -मच्छे बायपास आणि बेळगावच्या रिंगरोड बाबतही चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.