Thursday, April 25, 2024

/

केएलई”मध्ये हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वी : 17 वर्षीय रुग्णाला जीवदान

 belgaum

बेेेळगाव शहरानजीकच्या बेळगाव तालुक्यातील एका गावांमधील सामाजिक व आर्थिक दृष्ट्या कमकुवत कुटुंबातील एका 17 वर्षीय युवकावर केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये हृदयरोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली आहे. या पद्धतीने केएलई हॉस्पिटलमध्ये दुसऱ्यांदा हृदयरोपण शस्त्रक्रिया झाली असून नुकत्याच झालेल्या शस्त्रक्रियेमुळे संबंधित युवकाला जीवदान मिळाले आहे.

केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये हृदयरोपणाची गरज असणारे 20 रुग्ण होते. परंतु त्यांना हृदयदाता (डोनर) मिळू शकला नाही. त्यामुळे त्यांच्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान काकती येथील एक 17 वर्षीय युवक श्वास घेण्यास त्रास होत असल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. त्याला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते.

पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ. विरेश मानवी आणि त्याची तपासणी करून त्याचे हृदय नाजूक असल्याचे सांगितले. हॉस्पिटलचे प्रमुख हृदय रोग तज्ञ (सर्जन) डॉ. रिचर्ड सालढाणा यांनी सदर युवकाचा प्राण वाचविण्यासाठी हृदयरोपण हा एकच पर्याय असल्याचे सांगितले. त्यासाठी कर्नाटक सरकारच्या अवयव दान प्राधिकरणाकडे जीवन सार्थकता योजनेत त्याचे नांव नोंदविण्यात आले. दरम्यान हॉस्पिटलमध्ये दाखल कोल्हापूरच्या एका 52 वर्षीय रुग्णाचा ब्रेन डेड झाल्याचे डॉ. रविशंकर नायक व डॉ. अमरीश नेर्लीकर यांनी अधिकृत जाहीर केले.

 belgaum

त्याच वेळी सिनियर फिजिशियन डॉ. व्ही. ए. कोठेवाले यांनी सदर रुग्णाच्या कुटुंबियांचे समुपदेशन करून हृदय दानासाठी प्रवृत्त केले. संबंधित कुटुंबाने हृदय दान करण्यास संमती दर्शविल्यामुळे 26 फेब्रुवारी 2021 रोजी सदर हृदयरोपणाची शस्त्रक्रिया सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत यशस्वीपणे पार पडली. या शस्त्रक्रियेद्वारे कोल्हापूरच्या त्या ब्रेन डेड रुग्णाचे हृदय काकती येथील 17 वर्षीय युवकाला बसविण्यात आले.

सदर शस्त्रक्रियेसाठी डॉ. रिचर्ड सालढाणा यांना डॉ. मोहन गाण, डॉ. किरण कुरकुरे, डॉ. रवी घटनट्टी, डॉ. प्रविण तंबर्लीमठ, डॉ. दर्शन डी. एस., डॉ. अभिषेक प्रभू, पीडियाट्रिक कार्डियाक इंटेन्सिव्हीस्ट डॉ. निधी गोयल, भूलतज्ञ आनंद वाघराळी, डॉ. शंकरगौडा पाटील, डॉ. अभिजीत शितोळे, डॉ. जब्बार मोमीन, डॉ. चेतना, डॉ.पृथ्वी, डॉ. श्वेता अवयव रोपण समन्वयक विनायक पुराणिक, प्रमोद बुक्याळकर तसेच सहाय्यक आनंद घोरपडे, किरण, अविनाश, सुनील, रियाज व मारिया यांचे सहकार्य लाभले.Heart transplatation

केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये आज मंगळवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये हॉस्पिटलचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी उपरोक्त माहिती देताना अवयवदानाची मानसिकता रुजण्यास अनेक रुग्णांना जीवदान मिळू शकते, असे सांगितले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. जाली, डॉ. रिचर्ड सालढाणा, डॉ. साधूनावर, डॉ. कोठेवाले व डॉ. नेर्ली उपस्थित होते.

दरम्यान, 25 दिवसांपूर्वी हृदयरोपण शस्त्रक्रिया झालेला रुग्ण प्रवीण नायक याने हॉस्पिटलच्या बेडवरून थेट प्रक्षेपणाद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. सततच्या खोकल्यासह मला जेवण जात नव्हते. मला समाजासाठी काहीतरी करावयाचे होते. परंतु प्रकृती साथ देत नव्हती. आता शस्त्रक्रियेनंतर मला बरे वाटत असून मी माझे स्वप्न पुरे करू शकणार आहे असे प्रवीणने सांगितले. प्रवीणच्या शरिराने रोपण केलेल्या हृदयाचा स्वीकार केला असून ते व्यवस्थित कार्यरत असून कोणताही संसर्ग झालेला नाही. केएलई हॉस्पिटलमध्ये प्रथम ज्यांच्यावर हृदयरोपण शस्त्रक्रिया झालेल्या वीरभद्र पाटील यांनीही हृदयरोपणनंतर आपण पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.