Friday, March 29, 2024

/

घड्याळाचे वाजले बारा! आणि वेळेचे तीन तेरा!

 belgaum

स्मार्ट सिटी बेळगावची गोष्टच न्यारी! शहराच्या स्वागताला असणाऱ्या रस्त्यांवर खड्डे.. जनावरे बसण्यासाठी उभारण्यात आलेले बसथांबे.. चौकाचौकात कचऱ्याचे साम्राज्य आणि ठिकठिकाणी करण्यात आलेले खोदकाम… या सर्व गोष्टी आता बेळगावकरांच्या अंगवळणी पडल्या आहेत. जणू बेळगाव हे “स्मार्ट सिटी” आहे यावरचा बेळगावकरांचा विश्वास तूर्तास उडाला आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातही प्रशासनाच्या दुर्लक्षपणाचे असेच उदाहरण नजरेस पडले आहे. तसे ते नवे काही नाही. परंतु बहुधा प्रत्येक चार-पाच महिन्यात “याचे” तीन तेरा होतातच. शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच धर्मवीर संभाजी महाराज चौकात, शहराच्या सौन्दर्यात भर पाडणारे एक “क्लॉक टॉवर” आहे. याची दुर्दशा प्रत्येक चार-पाच महिन्यात दिसून येते. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, राज्योत्सव दिन अशा महत्वाच्या दिवशी याठिकाणी प्रशासनाच्या वतीने रोषणाई करण्यात येते. परंतु अनेकवेळा हे घड्याळ बंद अवस्थेत आढळून येते. किंवा चारही बाजूनी वेळ दर्शविणाऱ्या या घड्याळात प्रत्येक बाजूमध्ये एक वेगळाच वेळ निदर्शनास येतो. शिवाय या भागात अनेकदा अंधाराचे साम्राज्य दिसून येते.

नागरिक चुकले कि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यास प्रशासन कोणतीही कसूर मागे ठेवत नाही. तर मग सरकारी मालमत्ता हाताळण्यास कमी पडलेल्या प्रशासनावर, लोकप्रतिनिधींवर आणि अधिकाऱ्यांवर कोणी, कशी आणि कोणती कारवाई करावी? नागरी सुविधेच्या बाबतीत तर बेळगावात बोंब आहेच. पण आता स्मार्ट सिटी अंतर्गत होणाऱ्या “उपक्रमांनी” बेळगावकरांचा छळ मांडला आहे. अशातच आहेत त्याच गोष्टी नीटपणे सांभाळता येत नाहीत तर मग सुधारणा झालेल्या नव्या गोष्टी प्रशासन भविष्यात कशा काय सांभाळेल? याबाबत संशय व्यक्त झालाच, तर त्यात वावगे ठरू नये. प्रत्येकजण प्रशासनाच्या नावाने “ठो” मारत आहे परंतु रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारणाऱ्यांचा “दम” आता ओसरला आहे. त्यामुळे बेळगावला कुणीही वाली नसल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.Dsc watch

 belgaum

असं म्हणतात कि बंद घड्याळ हे अशुभतेचे प्रतीक आहे. सहसा बंद घड्याळ असू नये असे बोलले जाते.. त्यामुळे वाईट गोष्टी घडतात अशी समजूत आहे. धर्मवीर संभाजी चौकात या मनोऱ्यावरील हे बंद घड्याळ शहराच्या विकासात अडथळा ठरू नये, म्हणजे मिळवलं!

वेळ काही कुणासाठी थांबत नाही. ती वेळेवर येते आणि वेळेवर जाते. आपणच मग वेळेच्या मागेपुढे धावत राहतो. वेळेचे महत्व हे आजच्या शतकात प्रत्येकाला समजले असेल. बेळगावच्या विकासासाठी प्रशासन योग्य वेळेत योग्य पावले उचलण्यात तरबेज व्हावे, आणि बेळगावकरांना स्मार्ट सिटीच्या या “वाईट वेळेतून” लवकर बाहेर काढावे, हीच अपेक्षा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.