बेळगावकरानो आता शड्डू माराच !

0
 belgaum

कुस्तीत पैलवानाचा दम उखडला तर कुस्ती थांबवावी लागते, कारण त्याच्या फुफ्फुसांची दम धरण्याची क्षमता संपलेली असते अंगातील प्राण वायूचे प्रमाण घटत गेलेले असते. अशी परिस्थिती सध्या कोरोनाशी लढणाऱ्या प्रशासनाची झाली आहे.

गेले चार महिने सतत कोरोनाशी झुंज देत देत प्रशासनच दमातनं उखडलेलं आहे.सिव्हिल इस्पितळातील डॉक्टर्स,कर्तव्य बंदोबस्तात असणारे पोलीस,महा पालिकेचे कर्मचारी चार महिन्याच्या परिश्रमाने थकले आहेत., त्यातील अनेक जणांना कोरोनाची बाधा देखील झाली आहे.त्यांनी कोरोनाशी दिलेला लढा अद्वितीयच आहे. दिवस रात्र रुग्णां बरोबर प्रत्येक क्षणाला साथ देत खंबीरपणे उभे होते, पण दिवसेंदिवस वाढणारा कोरोनाचा कहर त्यांना दमातून उखडवत आहे.

bg

त्यातच गणेशउत्सव जवळ आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनावर मोठा ताण येणार आहे. कोरोना बेळगावात चरमसीमेवर आहे या परिस्थितीत प्रशासनाला हतबल करायचं की त्यांचे हात बळकट करायचं आहे हे जनतेच्या हातात आहे.सण दरवर्षी येणारच आहेत पण आज आपण यातून तरुन जाऊ तर पुढच्या वर्षीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा करू शकतो.

आज प्रत्येक कुटुंबातील कर्त्या स्त्री पुरुषाचं असणं महत्वाचं आहे. क्षणभर डोळे मिटून असा विचार करा की आपण नसलो तर आपल्या कुटुंबाची कशी वाताहत लागेल, आणि मग एकंदर परिस्थितीशी लढायला तयार व्हा.अनेक संघटनांनी स्वतःहुन आपल्या कामाच्या वेळा कमी केल्या आहेत अनेक गणेश मंडळांनी दीड दिवसाचे गणपती ठेवून साधेपणाने गणेश उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे.

या सर्व गोष्टीचा साकल्याने विचार करून या वर्षीचा गणेश उत्सव सर्व बेळगावकरानी एक गाव एक गणपतीची संकल्पना मूर्त स्वरूपात आणून, अख्ख्या बेळगावात एकच गणपती ठेवावा, आणि थकलेल्या पोलीस प्रशासनाला नव संजीवनी द्यावी. अखेर उत्सव साजरा करणे महत्त्वाचे, भक्तिभाव महत्वाचा, परंपरा महत्त्वाची. या सर्व गोष्टी आपण एकच गणपती ठेवून करू शकतो. घरातच राहून घरातला गणपती अधिक भक्ती भावाने पुजुया. ही आपली सामाजिक आणि सामूहिक जबाबदारी आहे.

हा एकीचा शड्डू मारून कोरोना विरुद्ध बेळगावकरानी नव्या कुस्तीची सुरुवात करावी. बेळगावकरांचा लौकिक लढाऊ वृत्तीचा आहे! ही अनोखी लढाई कोरोनाला बेळगावच्या मातीत गाडून टाकिल यात तीळ मात्र शंका नाही.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.