Saturday, April 20, 2024

/

सीमावासीयांना घेता येणार मातृभाषेतून शिक्षण !* शिनोळीत होणार शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र

 belgaum

मातृभाषेतून शिक्षण घेता यावे आणि कॅम्पस सिलेक्शनमधून नोकरीची संधी मिळावी यासाठी सीमाभागालगत शिनोळी येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार दि. 19 जुलै रोजी शिवाजी विद्यापीठ येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार मा. उदय सामंत यांच्यासोबत बैठक पार पडली. सीमाभागातील विद्यार्थ्यांवर नेहमी अन्याय होत आहे. शिक्षण आणि नोकरीसाठी येथील विद्यार्थी नेहमी संघर्षाला सामोरे जातो. त्याच्यांवर भाषिक जुलूम होत आला आहे. सीमाभागातील जनतेने मराठी भाषेचा अभिमान, स्वाभिमान आणि जागर सन्मानाने तेवत ठेवला आहे. सीमावासीय बांधवांना अशा शैक्षणिक संकुलाची संकल्पना शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मनात आहे. त्या संकल्पनेला आता मूर्त रूप मिळत आहे.

तसेच येथे कला, वाणिज्य आणि विज्ञान हे पारंपरिक शिक्षण देणे हे उद्दिष्ट न ठेवता व्यापक विचार केला आहे. या उपकेंद्रातून शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून विविध व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. त्यामध्ये नॅनो सायन्स, फूड टेक्नॉलॉजी, एम. एस, डब्ल्यू, एम. बी. ए. शिवाय मराठी भाषेतून लेखन वाढावे यासाठी पटकथा लेखन, अनुवाद, जाहिरातलेखन, पत्रकारिता, अर्थशास्त्र, पर्यावरण, मानसशास्त्र हे विषय मराठीतून शिकवणे तसेच लोककला, ललितकथा, नाटय़शास्त्र यांचा समावेश आहे. कॅम्पस इंटरव्हय़ूही सुरु करण्यात येणार असून यामुळे सीमाभागातील युवक स्वतःच्या पायावर उभा राहील.

यामध्ये अनेक नेते, महाराष्ट्र एकीकरण समिती, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्था अशा अनेक संस्था आहेत यांच्याशी एक व्यापक बैठक घेण्याचे ठरले आहे. तसेच बेळगाव व खानापूर केंद्रबिंदू धरून हे उपकेंद्र चंदगडमध्ये व्हावे, असा ठराव कमिटीने केला आहे. तसेच शिनोळी बुद्रुक, शिनोळी खुर्द व तुडये ग्रामस्थांनी हे शैक्षणिक संकुल उभे करण्यासाठी जमीन स्वइच्छेने देण्याचे ठरविले आहे अशी माहिती आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.