Wednesday, November 27, 2024

/

आता रेल्वेच्या सुट्या भागांचे उत्पादन कित्तुरमध्ये?

 belgaum

रेल्वेगाडीचे सुटे भाग तयार करणारे देशातील नियोजित दुसरे केंद्र कित्तूर (जि. बेळगाव) येथे उभारण्यात येणार आहे. रेल्वे कोचेस आणि वॅगन्ससाठी लागणाऱ्या सुट्टया भागांचे उत्पादन करणारे एकमेव केंद्र कित्तूर तालुक्यात सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे खात्याच्या विचाराधीन आहे. रेल्वे बोर्डाने यासंदर्भात नुकताच एक प्रस्ताव मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यासमोर मांडला आहे. जर राज्य सरकारने मान्यता दिली तर रेल्वेचे सुटे भाग बनविण्याची सुविधा उपलब्ध असणारे कित्तूर हे देशातील रायबरेली नंतरचे दुसरे केंद्र ठरणार आहे.

रेल्वे बोर्डाचे सदस्य राजेश अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेचे डबे (कोचेस), वाघिनी (वॅगन्स) आणि रेल्वेतील आसनांची मागणी सातत्याने वाढत असल्याने रेल्वेगाडीच्या सुट्या भागांचे उत्पादन करणाऱ्या अशा केंद्राची गरज निर्माण झाली आहे. तथापि सदर केंद्राच्या उभारणीसाठी रेल्वे किंवा राज्य सरकार आपला पैसा खर्च करणार नाही. उत्पादकांनाच जमिनीसाठी आणि केंद्राच्या उभारणीसाठी पैशाची गुंतवणूक करावी लागणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सरकारीसुत्रांनी सांगितले.

रेल्वेला सहाय्यक सुटे भाग बनविण्याचे केंद्र उभारण्यासाठी रेल्वे खात्याला सुमारे 150 एकर जमिनीची गरज आहे. ती कित्तूर तालुक्यात तशी आवश्यक पद्धतीची जमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून येथे नियोजीत केंद्राचा भविष्यात विस्तार देखील करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे कित्तूर येथे सदर केंद्र झाल्यास रेल्वेचे सुटे भाग गोवा येथून समुद्रमार्गे निर्यात करता येणार आहेत. आता सर्वकांही राज्य सरकारच्या हातात आहे, त्यांनी आकर्षक सवलती आणि प्रोत्साहन देऊन उद्योगधंद्यांना नियोजित केंद्राच्या उभारणीसाठी आकर्षित करावयास हवे, असे बोर्डाचे सदस्य अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

रेल्वे कॉचेस आणि वॅगन्सच्या आकाराची कवचे (डब्यांचे पृष्ठभागाचे आवरण) होगी, ब्रेक सिस्टिम्स आणि इंटिरियर्सचे उत्पादन या नियोजित केंद्रामध्ये केले जाईल. या केंद्रातील उत्पादनांसाठी वेगळा निर्यात विभाग सुरू करण्याची विनंती आम्ही राज्य सरकारला केली आहे. यासाठी रेल्वेचे सुटे भाग बनविणाऱ्या सर्व उत्पादकांना एका छत्राखाली आणले जाईल. तसेच आवश्यक सर्व परवान्यांना सिंगल विंडोद्वारे मंजुरी देण्याची व्यवस्था केली जावी अशी विनंतीही करण्यात आली असल्याचे रेल्वे बोर्डाचे सदस्य राजेश अग्रवाल यांनी सांगितले.

रेल्वे गाडीचे सुटे भाग बनविणाऱ्या या पद्धतीच्या आस्थापनामुळे कित्तूर आणि आसपासच्या परिसराचा झपाट्याने विकास होणार आहे. या परिसरातील लोकांना मोठ्याप्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होण्याबरोबरच याठिकाणी ये-जा करणाऱ्या मालवाहू वाहनांमुळे परगावच्या लोकांचे मोठ्या संख्येने याठिकाणी येणे-जाणे सुरू होईल. परिणामी येथील लहान-मोठे व्यवसाय आणि उद्योगधंद्यांना मोठा फायदा होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.