Saturday, April 20, 2024

/

कर्नाटकाचे सरकार हे संत वचनांना काळिमा फासणारे नालायक सरकार: सबनीस यांची टीका

 belgaum

महाराष्ट्रातील साहित्यिकांना दडपशाहीने इदलहोंडच्या साहित्य संमेलनात सयहभागी होण्यास बंदी घालणारे कर्नाटक सरकारने संत कनकदास संत बसवेश्वरांच्या वचनांना काळीमा फासला आहे यासाठी या नालायक, डोकं बिघडलेल्या सरकारचा त्यांच्याच भूमी ठामपणे उभे राहून मी जाहीर निषेध करतो, असे परखड वक्तव्य आज रविवारी इदलहोंड (ता. खानापूर) येथील गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी केले.

कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करून बेळगाव पोलिस प्रशासनाने आज रविवारी इदलहोंड (ता. खानापूर) येथील गुंफण सद्भावना साहित्य संमेलनातील महाराष्ट्रामधील साहित्यिकांच्या सहभागावर बंदी घातली. या पार्श्वभूमीवर संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी खानापूर येथे आज रविवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उपरोक्त वक्तव्य केले. ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, कर्नाटक सरकारचे नेहमीप्रमाणे डोकं फिरलं असून त्यांच्यात नवा हिटलर जागा झाला आहे. त्यांनी पोलिसांकरवी फोनाफोनी करून संमेलन होऊ नये यासाठी काल रात्रीपासून दडपशाही सुरू केली. या झुंडशाहीला कोणत्याही प्रकारे नैतिक व कायदेशीर आधार नाही. ईदलहोंडचे साहित्य संमेलन हे सद्भावनावर आधारित संमेलन आहे. तेंव्हा अशा सद्भावनेवर आधारित संमेलनाला नाकारण्याचा करंटेपणा व कद्रुपणा जर कर्नाटक सरकार दाखवत असेल तर त्यांच्यावर संविधानाचा खून पाडल्याचा आरोप ठेवून केंद्र सरकारने गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण एवढी बदमाशी, लबाडी तसेच साहित्य व भाषेच्या संदर्भात कर्नाटक सरकारची एवढी मोठी मुजोरी वाढली आहे. येथील भैरप्पा यांच्यासारख्या थोर साहित्यिकाच्या संस्कृतीला शोभेल असे कार्य कर्नाटक सरकार करत आहे असे मला वाटत नाही किंबहुना येथील जुन्या काळातील संत कनकदास संत श्री बसवेश्वर यांच्या या सर्व वचनांना काळिमा पासून त्यांचा पराभव करून कर्नाटक सरकारने स्वातंत्र्याची मुस्कटदाबी केलेली आहे.

संयुक्त महाराष्ट्राचा लढा 105 हुतात्मे देऊन यशस्वी झाला परंतु निपाणी कारवार बेळगावचा सीमाप्रश्न अजून अनिर्णित राहिला आहे. गेले अनेक वर्षे भिजत पडलेला हा प्रश्न केंद्राने त्वरित सोडवला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने यापूर्वी हा प्रदेश केंद्रशासित करून बेळगावच्या 20 लाख जनतेचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु यासंदर्भात कर्नाटक व महाराष्ट्र सरकारचे एकमत झाले नाही, शिवाय सुप्रीम कोर्टाचा निर्णय ही अद्याप लागलेला नाही त्यामुळे येथील मराठीभाषिक लोकांचे दुर्दैव आहे.

Shripal sabnis press
Shripal sabnis press

महाराष्ट्रातील सध्याचे माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काल-परवा काही चांगले निर्णय घेतले आहेत आणि सीमा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने हालचाली ही सुरू केले आहेत. याबद्दल उद्धवजींच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील सरकारचे अभिनंदन करणे या कर्नाटकाच्या भूमीमध्ये मला आवश्यक वाटते. आम्ही साहित्यिक मराठी भाषा साहित्य व संस्कृतीचे संवर्धन व्हावे यासाठी गेली अनेक वर्षे झटत आहोत. मराठी बांधव या प्रांतात देखील आहेत त्यांची बांधीलकी आमच्याशी असल्याने त्यांच्या भावनांचे आकांक्षांचे प्रतिबिंब या साहित्य संमेलनात असते अशाप्रकारच्या साहित्य संमेलनात भाग घेण्याची संधी मिळत असल्याने मी आनंदाने इदलहोंड येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारले. तथापि कर्नाटक सरकारने दडपशाही करून आम्हाला संमेलनस्थळी जाऊ दिले नाही. कर्नाटक सरकार हे नालायक आहे ज्याला विवेक कळत नाही, शांतता म्हणजे काय माहीत नाही अशा डोके बिघडलेल्या या सरकारच्या चुकीच्या कृतीमुळे शांततेला धक्का लागला आहे. कर्नाटकामधील कायदा व सुव्यवस्था परिस्थितीही कर्नाटक सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच बिघडली आहे. आता याचे प्रतीध्वनी महाराष्ट्रात काय उमटतील हे कर्नाटक सरकारने समजून घ्यावे, असेही श्रीपाद सबनीस म्हणाले.

महाराष्ट्र व कर्नाटकची सीमा पेटावी असे मला वाटत नाही, कारण ही सीमा म्हणजे भारत पाकिस्तानची सीमा नाही. याची जाणीव जर कर्नाटक सरकारला असती तर त्यांनी अशा प्रकारचा चुकीचा व बेशरम निर्णय घेतला नसता. परंतु ज्या अर्थी तोच निर्णय त्यांनी घेतला त्याअर्थी कर्नाटक सरकारला खाज निर्माण झाली आहे. त्यांच्याच पुढाकारातून हिंसात्मक आंदोलन व्हावे अशा प्रकारची प्रेरक व नालायक कृती कर्नाटक सरकारने केलेली आहे. पोलिसांच्या हातात दंडुके देऊन साहित्यिकांना अडविण्याचा पराक्रम अशोभनीय आहे मराठी साहित्य हे सर्वांचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा मराठी आहे. ज्या छत्रपती शिवरायांचे पुतळे बेळगावसह कर्नाटकातील ठिकठिकाणच्या चौकात सन्मानाने उभे आहेत, ज्या शिवरायांनी मराठी शब्दकोशाची निर्मिती केली. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या ध्येया विरुद्ध सध्याचे कर्नाटकातील भाजप सरकार नालायकपणाची कृती करत असेल तर त्याचा जाहीर निषेध करणे हे मी माझे पहिले कर्तव्य समजतो. त्यांच्या भूमीतच ठामपणे उभे राहून मी येडियुरप्पा सरकारचा निषेध करतो. तसेच केंद्रातील मोदी सरकारला विनंती करतो की या नालायक सरकारला आवरा नाहीतर तुमच्या पक्षासह केंद्रातील सरकारचे धिंडवडे संपूर्ण देशभर निघतील. आगडोंब उसळण्यापूर्वी अशा प्रकारची कृती केल्याबद्दल कर्नाटक सरकारला चांगली समज द्यावी. सध्या महाराष्ट्रात तेथील सरकारचे सीमाप्रश्न सोडविण्यासंदर्भात चांगले नवे नवे स्तुत्य प्रयोग सुरू आहेत. आपल्याच मराठी, आपल्याच मातीत, आपल्याच संस्कृतीत, आपलेच मराठी बांधव मुस्कटदाबीचा अनुभव घेत आहेत हे परवडणारे नाही. सीमा प्रांतातील मराठी लोकांचा श्वास हा मराठी संत, साहित्य आणि संस्कृतीचा श्वास आहे. या श्वासाची महाराष्ट्र सरकारला शपथ देऊन मी विनंती करू इच्छितो की, महाराष्ट्रातील सरकार आणि जनतेने जोरदार आवाज उठून याप्रश्नी दिल्लीचे तक्त हलवावे. सुप्रीम कोर्टात चांगले वकील देऊन सीमा प्रश्नाचा काय वारा महाराष्ट्राच्या बाजूने व्हावा या दृष्टीने प्रयत्न करावेत.

कन्नड भाषिक व कन्नड संस्कृती यांच्याशी आमचं वैर नाही पुर्वी मराठी व कन्नड संस्कृती एकत्र आणल्या आहेत. कन्नड साहित्य क्षेत्राच्या संवर्धनात योगदान देणाऱ्या सर्व प्रतिभावंतांना बद्दल मला प्रचंड आदर आहे. मराठी व कन्नड भाषिकांमध्ये एकात्मता व एकरूपता साधली पाहिजे, असे माझे मत आहे असे सबनीस यांनी सांगितले. मराठीचा झेंडा कर्नाटकाच्या भूमीत फडकवताना आमचे मराठीवरील प्रेम कानडीच्या द्वेषावर अवलंबून नाही. कानडी ही आमची भगिनी भाषा आहे. आम्हाला सर्व भाषणबद्दल आदर आहे असे सांगून पुन्हा एकदा कर्नाटक सरकारचा निषेध करत साहित्यिक श्रीपाद सबनीस यांनी पत्रकार परिषदेतच इदलहोंड येथील गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाचे आपण येथूनच उद्घाटन झाल्याचे जाहीर करत असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.