Thursday, April 18, 2024

/

साहित्य वादासाठी नाहीतर संवादासाठी: अशोक बागवे

 belgaum

वेदना असल्याशिवाय साहित्यनिर्मिती होत नाही ही साहित्य वादासाठी नाहीतर संवादासाठी आहे असे विचार महाराष्ट्रातील प्रख्यात कवी अशोक बागवे यांनी व्यक्त केले.

कुद्रेमनी येथील बलभीम साहित्य अकादमीतर्फे आज रविवारी आयोजित 14 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बागवे बोलत होते. शब्दांचे अर्थ कळावेत यासाठी व्रत घेऊन लेखणी झिजवतो तो खरा साहित्यिक. कारण तो झिजतो तेंव्हा साहित्याला समृद्धी प्राप्त होते. साहित्यिक अंतिम सत्य सांगतो, वेदनेला संवेदना देतो, तो सत्य, शिव, सुंदर याची जपणूक करतो असे सांगून भाषा आपण निर्माण केली तर त्यात भेद कशासाठी? असा सवाल अशोक बागवे यांनी केला. मुलांना शब्दकोश द्या त्यांना शब्दांची शेती पिकू द्या. शास्त्रावर शस्त्र उगारणे हिंसा आहे हे असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कवी बोलतो प्राणातून आणि ढगावर ढग या कविता सादर केल्या.

कुद्रेमनी (ता. बेळगाव) येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरापासून आज सकाळी 9 वाजता संमेलनाच्या ग्रंथदिंडीचा सोहळा सुरू झाला. तत्पूर्वी विठ्ठल- रखुमाई मूर्ती पूजन अर्जुन जांबोटकर, पालखी पूजन शांताराम पाटील, ग्रंथ पुजन प्रकाश पाटील आणि ग्रंथदिंडीचे उद्घाटन डॉक्टर कान्होजी यांच्या हस्ते झाले. गावातील प्रमुख मार्गावरून सवाद्य निघालेल्या या ग्रंथदिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दिंडीत बेळगावसह सीमाभागातील तसेच महाराष्ट्रातील साहित्यिक आणि कवींसह बहुसंख्य साहित्यप्रेमींचा सहभाग होता. ग्रंथदिंडीच्या अग्रभागी लेझीम पथकांसह भजनी मेळे असल्यामुळे दिंडीचा मार्ग वाद्यवृंदांच्या गजराने दुमदुमून गेला होता. गावातील प्रमुख मार्गावरून फिरून या ग्रंथदिंडीची संमेलनस्थळी कुद्रेमनी हायस्कूलच्या पटांगणावर कै. परशराम मीनाजी गुरव साहित्य नगरीमध्ये सांगता झाली.

 belgaum
 Kudremani sahitya
Kudremani sahitya

याप्रसंगी अश्वारूढ पुतळा पूजन लक्ष्मण धामणेकर, प्रवेशद्वार उद्घाटन संभाजी पन्हाळकर, कै. परशुराम गुरव साहित्यनगरीचे उद्घाटन काकतकर यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथ दालनाचे उद्घाटन ज्ञानेश्वर पाटील आणि कै. परशुराम गुरव स्मारक पूजन पुंडलिक दळवी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला प्रारंभ झाला. याप्रसंगी राजू मनोळकर , अॅड. सुधीर, चव्हाण, विनायक गवसेकर, अर्जुन राजगोळकर, डॉ. वंदना गुरव, डॉ. भाग्यश्री कट्टीमनी, संजय पाटील आणि विष्णू जांबोटकर यांच्या हस्ते संत- महात्मे आणि थोर पुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. बलभीम संघाचे अध्यक्ष एम. बी. गुरव यांच्या प्रास्ताविकानंतर स्वागताध्यक्ष नागेश राजगोळकर यांनी व्यासपीठावरील मान्यवरांसह संमेलनाला उपस्थित सर्वांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष प्रा. अशोक बागवे आणि उद्घाटक जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्या जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन झाले.

आपल्या उद्घाटनपर भाषणात जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी मायमराठीचा दुस्वास खवपुन घेणार नाही. कानडीचा राग नाही, पण मराठी आई आहे. तेंव्हा शासनाने सरकारी कागदपत्रे कानडी बरोबरच मराठी भाषेमध्ये ही उपलब्ध करून द्यावीत असे सांगून आपले समयोचित विचार व्यक्त केले.

उद्घाटन समारंभानंतर दुसऱ्या सत्रात कवी संमेलन झाले. या कविसंमेलनात कवी विष्णू थोरे, कवी प्रशांत केंदळे, कवी उमेश सुतार व कवयित्री मानसी दिवेकर यांचा सहभाग होता. तिसऱ्या सत्रात सहभोजन झाल्यानंतर चौथ्या सत्रात साहित्यिक शांतिनाथ मांगले यांचा कथाकथनाचा कार्यक्रम झाला. सदर साहित्य संमेलनास कुद्रेमनी पंचक्रोशीतील तसेच बेळगावसह सीमा भागातील कवी, साहित्यिक आणि बहुसंख्य साहित्यप्रेमी विशेष करून महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.