Friday, April 19, 2024

/

शहराला मटका आणि गांजाचा विळखा

 belgaum

बेळगाव शहर हे शांत आणि सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या शहराला मटका आणि गांजाचा विळखा बसत आहे. अमली पदार्थांच्या विळख्यात तरुण पिढीला अडवण्याचे काम सुरू झाले असून त्यामध्ये मध्य प्रदेश महाराष्ट्राबरोबरच बेळगाव जिल्ह्यातील विविध भागातील रॅकेट्स काम करत आहेत. तसेच या तरुण पिढीला मटक्याच्या विळख्यात अडकवण्याचा प्रयत्न सुरू झाला असून यासाठी काढण्यात आलेला बेळगाव बाजार मटका सध्या प्रसिद्ध होत आहे.

या दोन्ही व्यवसायांना सुरू ठेवण्यासाठी काही पोलीस मदत करत असल्याची माहिती स्थानिक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केल्यामुळे धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. कल्याण मटका बरोबरच बेळगावात बेळगाव बाजार स्थानिक मटक्याचे पेव वाढले आहे. स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने मटक्याच्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. शहरातील पाच ते सहा जणांनी केलेल्या सिंडिकेट च्या माध्यमातून हा बेळगाव बाजार चालवला जात असून त्यात अनेकांचा बाजार होत आहे. त्यांच्या नादी लागलेले तरुण कामगार वर्ग हमाल आपली कमाई मटक्यात उध्वस्त करत असून अनेक संसार उघड्यावर येण्याची शक्यता आहे .त्याच पद्धतीने दारू जुगार सारख्या विळख्यात अडकलेले तरुण अमली पदार्थांच्या नादाला लागत आहेत.

बुधवारी पोलिसांनी अटक करून महाराष्ट्र-मध्यप्रदेश मधून आणलेल्या गांजा जप्त केला. मात्र आणखी अनेक जण या व्यवसायात काम करत असून त्यांना काही पोलिसांचाच आशीर्वाद मिळत असल्याचे दिसत आहे. मटका बाजार चे सिंडिकेट स्थापन करण्यासाठी काही पोलिस अधिकारीच मदत करत होते .अशी माहिती मिळाली आहे तर गांजाचा व्यवसाय फोफवण्यास पोलिसांचा दुर्लक्षितपणा कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. बेळगाव पोलिसांनी आता धडक कारवाई सुरू करून मटका जुगार व गांजा विकणाऱ्या मंडळींचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. बाळू बाजार व बेळगाव बाजार साठी काही पोलिसच मैदानात उतरले होते इतर बुकींवर खटले दाखल करून अमुक बुकीला चिठ्ठ्या द्या असे सांगत आपला हप्ता वाढवून घेण्याचा प्रयत्न यातून झाला आहे. त्यामुळे सिंडीकेट ची चर्चा बेळगाव शहरात सुरु असून खासकरून संसारात अडथळे येत असलेल्या महिला वर्गातून त्यामुळे त्याला जोरदार विरोध होऊ लागला आहे.

 belgaum

वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण घेणारी तरुणाई गांजाच्या नादाला लागत आहे .त्यांना खास गांजा आणि पन्नी पुरवून हा व्यवसाय वाढवला जात आहे. त्याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार आणि त्यांच्या हाताखालील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी आता लवकर कामगिरी करून मटक्याच्या व गांजाच्या विळख्यातून बेळगाव शहराला बाहेर काढावे अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.