बेळगावला दुसरे महाबळेश्वर मानले जाते. मात्र बेळगाव जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा अधिकच तीव्र होऊ लागल्या आहेत. एकूण 90 गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असला तरी अजूनही काही गावांना पाण्याची भीषण टंचाई भासू लागली आहे दहा वर्षात ही समस्या अधिकच गंभीर बनली आहे. त्यामुळे दहा वर्षापासून काही गावे तहानलेली आहेत मात्र याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे.

ही समस्या सोडविण्यासाठी कोट्यावधी निधी खर्च झाला असला तरी ही समस्या कायम आहे. डोंगरी वाड्या-वस्त्यांवरील झऱ्यावरील योजना असल्याने मार्च ते मे मध्ये पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवू लागते. मात्र इतर गावात शेती व इतर पिकांसाठी लागणारे पाणी यामुळे अनेक योजना कुचकामी ठरल्या आहेत.
पाणी टंचाईतून उपाययोजनांची मागणी करण्यात येत असली तरी त्या योजना योग्य प्रकारे राबविण्यात न आल्याने निश्चितच चिंताजनक बाब बनली आहे.
वर्षानुवर्षे होणाऱ्या या टंचाईच्या आराखड्याचा पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. मागील दहा ते पंधरा वर्षांपासून अनेक गावे पाण्यासाठी भटकंती करताना दिसतात. त्यामुळे ही समस्या नक्की कधी कमी होणार? असा प्रश्न निर्माण होत आहे. दुष्काळ किंवा टंचाई जाहीर करताना विविध निकष बघितले जातात. आणि पाहून पर्जन्यमान, भूजलपातळी आदी गोष्टींचा विचार करून टंचाई जाहीर करण्यात येते. मात्र या वर्षी संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याची समस्या गंभीर बनली आहे.
एकीकडे टॅंकरने पाणीपुरवठा होत असतानाच आणखी काही गावांना पाण्यासाठी कोस दूर पायवाट तुडवावी लागत आहे. तरीही ही समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना आखल्या नाहीत. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
काही ठिकाणी शेतात पाणी असताना गावात मात्र पाण्याचा ठणठणाट असल्याच्या तक्रारी येतात तर काही गावात पाणी उपलब्ध असतानाही त्याचे योग्य नियोजन करण्यात न आल्याने पाण्याची समस्या गंभीर बनत आहे. त्यामुळे यापुढे तरी योग्य नियोजन करून सुरळीत पाणीपुरवठा करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.