बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेतील अडचणी दूर करण्यासाठी कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी आणि तालुका आरोग्याधिकारी नियुक्त करावेत, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीसंदर्भात यापूर्वी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयासह मुख्यमंत्री कार्यालय आणि राज्याच्या मुख्य सचिवांनाही ई-मेलद्वारे माहिती देण्यात आली आहे.
खानापूर तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी नसल्याने शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत असल्याचे समितीने निवेदनात म्हटले आहे. तत्कालीन गटशिक्षणाधिकारी रामप्पा यांच्या निवृत्तीनंतर या पदाचा अतिरिक्त कार्यभार मंजुनाथ हत्ती यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यांच्याकडे बीआरसी आणि गटशिक्षणाधिकारी पदाची जबाबदारी असल्याने विस्तीर्ण आणि दुर्गम भाग असलेल्या खानापूर तालुक्यातील शैक्षणिक कामकाजासाठी पुरेसा वेळ देता येत नसल्याचे समितीचे म्हणणे आहे.
या परिस्थितीची माहिती घेण्यासाठी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष तथा सीमाभागचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी २३ सप्टेंबर रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला भेट दिली होती. त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी (डीडीपीआय) कार्यालयात निवेदन देण्यात आले. तसेच मुख्यमंत्री कार्यालय आणि राज्याच्या मुख्य सचिवांनाही ई-मेलद्वारे या समस्येची माहिती देण्यात आली. मुख्य सचिवांच्या कार्यालयाकडून पुढील कार्यवाहीसाठी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला सूचना दिल्याचे ई-मेलद्वारे कळविण्यात आल्याचे समितीने सांगितले. या प्रकरणी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आरोग्य व्यवस्थेतील रिक्त पदे भरण्याची मागणी
खानापूर तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचाही प्रश्न समितीने उपस्थित केला आहे. तालुका आरोग्याधिकाऱ्यांवर भ्रष्टाचारविरोधी पथकाने कारवाई केल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांच्या जागी डॉ. संजीव नांद्रे यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तालुक्यातील अनेक ठिकाणी कायमस्वरूपी डॉक्टरांची पदे रिक्त असून, त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे रुग्णांना उपचारांसाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा समितीने केला आहे. रिक्त पदे भरून तज्ज्ञ आणि कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती करण्याबरोबरच तालुका आरोग्याधिकारी पदावरही कायमस्वरूपी अधिकारी नेमावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही महत्त्वाच्या क्षेत्रांतील प्रश्नांची दखल घेऊन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने करण्यात आले.
यावेळी समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, मुख्य सल्लागार अशोक घगवे, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन गोरले, उपाध्यक्ष नारायण मुचंडिकर, सुरज जाधव, श्रीकांत नांदूरकर, जोतिबा येळ्ळूरकर, विकास कलघटगी आदी उपस्थित होते.





