बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीची ताकद संपल्याच्या जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या वक्तव्यावर युवा समितीचे नेते शुभम शेळके यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मराठी माणसांच्या भावनांचा आदर राखून वक्तव्य करावे, अशी विनंती करत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी होऊन मराठी भाषिकांच्या भावना समजून घेण्याचे आवाहन केले आहे.
कन्नड संघटनेच्या बैठकीत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीची ताकद संपली असून, गेल्या तीन वर्षांपासून परवानगी नसतानाही काळ्या दिनाची फेरी काढली जात असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच या संदर्भात कारवाई केली जात असल्याचेही त्यांनी म्हटले होते. या वक्तव्याला उत्तर देताना शुभम शेळके यांनी मराठी भाषिकांच्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.
‘आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच आंदोलन करतो’
आवाज उठवणे म्हणजे प्रक्षोभन करणे असे वाटत असेल, तर त्यावर आपण काय बोलणार, असा सवाल शुभम शेळके यांनी उपस्थित केला. आजपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समितीने कायद्याची चौकट ओलांडणारी किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी वक्तव्ये केलेली नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वीही केवळ एखाद्या कृतीला प्रतिक्रिया देण्याची भूमिका घेतल्याचे सांगत, मराठी माणसांबद्दल बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवावे आणि सर्वांचा मान राखावा, असे आवाहन त्यांनी केले. मराठी भाषिकांनी आजपर्यंत कोणाचाही अपमान केलेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.

‘७० वर्षांपासून लोकशाही मार्गाने लढा सुरू’
महाराष्ट्र एकीकरण समितीची ताकद संपल्याचे सांगितले जात असले, तरी गेल्या ७० वर्षांपासून मराठी माणूस लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने आपला लढा टिकवून आहे, असे शुभम शेळके यांनी सांगितले. या काळात मराठी भाषिकांवर कारवाई होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
काळ्या दिनाच्या फेरीत मराठी भाषिकांच्या भावना व्यक्त होतात. या फेरीत दारू, बिर्याणी, नाच-गाणे किंवा धिंगाणा नसतो, तर मराठी जनतेच्या मनातील भावना व्यक्त केल्या जातात, असे त्यांनी स्पष्ट केले.
काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी होण्याचे आवाहन
मराठी माणसांच्या भावना समजून घ्यायच्या असतील, तर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्वतः काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी होऊन पाहावे, अशी नम्र विनंती शुभम शेळके यांनी केली. जिल्हाधिकारी या आवाहनाला प्रतिसाद देतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मराठी भाषिकांच्या भावना दुखावतील अशी वक्तव्ये टाळून त्यांच्या भावनांचा आदर राखावा, असे आवाहनही शुभम शेळके यांनी यावेळी केले.





