belgaum

गोकुळ निवडणुकीसाठी भंडाऱ्याची शपथ? अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निवेदन

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना श्री यल्लमा देवीच्या भंडाऱ्याची शपथ देऊन विशिष्ट उमेदवार किंवा पॅनेलच्या बाजूने मतदान करण्यासाठी दबाव आणला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बेळगाव शाखेच्या वतीने गुरुवारी (१५ ऑक्टोबर) बेळगावच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी १८ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर १६ ऑक्टोबर रोजी सौंदत्ती रोडवरील निकम कल्याण मंडप येथे मतदारांना बोलावून सौंदत्ती येथील श्री यल्लमा देवीच्या पवित्र भंडाऱ्याची शपथ देण्याचा कार्यक्रम आयोजित केला जाण्याची माहिती मिळाल्याचे समितीने निवेदनात म्हटले आहे.

 belgaum

या माध्यमातून मतदारांवर विशिष्ट उमेदवार किंवा पॅनेलच्या बाजूने मतदान करण्यासाठी दबाव आणला जाऊ शकतो, अशी भीती समितीने व्यक्त केली आहे. त्यामुळे संबंधित कार्यक्रमाची तातडीने चौकशी करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

कार्यक्रमस्थळाची पाहणी करून आयोजकांकडून माहिती घ्यावी, मतदारांवर दबाव किंवा धमकी दिली जात आहे का, याची चौकशी करावी आणि आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित कायद्यांनुसार कारवाई करावी, अशी मागणीही समितीने केली आहे.

यावेळी आनंद मेणसे अनिल आजगावकर नागेश सातेरी यांच्यासह अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.