belgaum

या निवडणुका ताकदीने लढण्याचा येळ्ळूर समितीचा निर्धार

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक सरकारने जिल्हा पंचायत, तालुका पंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुका घेण्याची घोषणा केल्यानंतर येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीने या निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्धार केला आहे. मराठी भाषिकांची लोकभावना आणि सीमाप्रश्नावरील भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी या निवडणुका मोठ्या मताधिक्याने जिंकण्याच्या दृष्टीने संघटनात्मक तयारी करण्याचा निर्णय नेताजी सांस्कृतिक भवन येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष वामनराव पाटील होते.

बैठकीच्या प्रारंभी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, अशोक बस्तवाडकर, प्रेमा सिद्दोजी मुरकुटे, विनायक उघाडे, शालन प्रकाश सायनेकर, रवि तुळजाई, चांगाप्पा सायनेकर, सिद्दापा दणकारे आणि यल्लापा भुजंग चिट्टी यांना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

समितीचे सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट करताना, सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्नाच्या दाव्याला बळकटी मिळण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या मताधिक्याने जिंकणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

 belgaum

युवानेते दत्ता उघाडे यांनी निवडणूक लढविण्यासाठी सर्वांची संमती आणि कार्यकर्त्यांचे प्रामाणिक प्रयत्न आवश्यक असल्याचे नमूद केले. अनिल हुंदरे यांनी जबाबदारीने काम केल्यास यश मिळू शकते, असा विश्वास व्यक्त करून कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले.

कार्याध्यक्ष दुद्दापा बागेवाडी यांनी येळ्ळूरमधील १३ वॉर्डांमध्ये टप्प्याटप्प्याने बैठका घेऊन वॉर्डनिहाय समित्या स्थापन करण्याची सूचना केली. उदय जाधव यांनी कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक बांधिलकी निर्माण करून एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर जबाबदाऱ्या सोपविण्याचे आवाहन केले. पत्रकार बी. एन. मजुकर यांनी तरुणांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता समितीच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे सांगितले.

मारुती तुळजाई यांनी अवचारहट्टी येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले. नागेश बोबाट यांनी कार्यकर्त्यांनी आपापल्या वॉर्डातील नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करावे, असे मत व्यक्त केले. यावेळी आपाजी कुगजी, अनिल ग. पाटील आणि शिवाजी ह. पाटील यांनीही विचार मांडले.

महापालिकेतील ठरावाचा निषेध

बेळगाव महानगरपालिकेत महाजन अहवालासंदर्भात झालेल्या ठरावाला विरोध केल्याबद्दल नगरसेवक रवि साळुंखे, शिवाजी मंडोळकर आणि वैशाली भातकांडे यांचे बैठकीत अभिनंदन करण्यात आले. या ठरावाला संमती देणाऱ्या मराठी भाषिक मतदारांच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या नगरसेवकांच्या भूमिकेचा निषेधही व्यक्त करण्यात आला.

याशिवाय, १ नोव्हेंबरच्या काळ्या दिनासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या वक्तव्याचा बैठकीत निषेध करण्यात आला. तसेच पुणे येथे एमपीएससी आंदोलनादरम्यान सीमाप्रश्नाचा उल्लेख करून मराठी भाषिकांच्या व्यथा मांडल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील तरुण विद्यार्थी विवेकानंद पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले.

बैठकीला चांगदेव परीट, यलुप्पा पाटील, नेताजी गोरल, सतीश परशराम धामणेकर, रमेश ज. धामणेकर, सुरज गोरल, गोविंद बापूसाहेब पाटील, रमेश पाटील, दौलत पाटील, सतीश देसूरकर, लक्ष्मण कुंडेकर, प्रकाश मालुचे, सचिन कुंडेकर, बाळकृष्ण धामणेकर, आनंदा कंग्राळकर, बाळासाहेब पावले यांच्यासह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपाध्यक्ष राजू पावले यांच्या आभारप्रदर्शनाने बैठकीची सांगता झाली. बैठकीला युवकांची लक्षणीय उपस्थिती होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.