बेळगाव लाईव्ह | राकसकोप
दसरा उत्सवानिमित्त राकसकोप येथील हौशी युवकांच्या वतीने रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘एक दिवस गावासाठी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा व निवृत्त व्यक्तींचा सत्कार, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राजा शिवछत्रपती चौक येथील समाज भवनात सायंकाळी ६ ते ८ या वेळेत मोफत रक्तदाब (बीपी) व रक्तातील साखरेची (शुगर) तपासणी करण्यात येणार आहे. मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगाव व सहकाऱ्यांच्या सौजन्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
यानंतर रात्री ८ वाजता शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये उत्कृष्ट यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच निवृत्त सैनिक, निवृत्त कर्मचारी आणि निवृत्त अंगणवाडी सेविकेचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. विष्णू ए. कंग्राळकर यांचे ‘निरोगी शरीर, आनंदी जीवन’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या माध्यमातून नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत राकसकोप भजनी मंडळातर्फे भारूड सादर करण्यात येणार असून, गावातील प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह हौशी कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष सूचना
राकसकोप गावातील तसेच शिक्षणासाठी बाहेरगावी राहणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये दहावी व बारावीच्या परीक्षेत ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेसह कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे. या विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.
गावातील आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन आरोग्य तपासणी, मार्गदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.




