belgaum

तर… प्रल्हाद जोशी यांनी राजीनामा द्यावा!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह | बेळगाव

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसदराच्या मागणीने आता आंदोलनाचे स्वरूप अधिक तीव्र झाले आहे. उसाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हुबळीकडे पदयात्रा सुरू केली असून, या पदयात्रेचा दुसरा दिवस आहे. बेळगाव शहराच्या उंबरठ्यावर पोहोचलेली ही पदयात्रा कित्तूरमार्गे हुबळीकडे रवाना होणार आहे. हुबळीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

या आंदोलनातून शेतकरी नेत्यांनी आता थेट केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या राजीनाम्याची मागणी पुढे आणली आहे. ऊसदराचा प्रश्न सोडवता येत नसेल, तर प्रल्हाद जोशी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली आहे.

 belgaum

ऊसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर मिळावा, तसेच एमएसपी ३१ वरून ६० करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली आहे. या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे.

सरकारने ऊसदराच्या प्रश्नावर समिती नियुक्त केली असली, तरी या समितीवर आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली आहे. समितीच्या नियुक्तीचे स्वागत करतानाच, तिचा आपल्या आंदोलनाशी संबंध नसल्याचे सांगत शेतकरी नेत्यांनी या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

हतटगी टोलनाक्यावरून सुरू झालेली ही पदयात्रा आता बेळगावमार्गे हुबळीकडे कूच करत आहे. हजारो शेतकरी या पदयात्रेत सहभागी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. ऊसदराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे.

‘मागण्या मान्य करा, अन्यथा राजीनामा द्या’, असा थेट संदेश देत शेतकऱ्यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली आहे. हुबळीत प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर होणाऱ्या निदर्शनांमुळे ऊसदराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, केंद्र आणि राज्य सरकार या आंदोलनावर काय भूमिका घेणार, याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.