बेळगाव लाईव्ह | ऊसदरवाढीसह विविध मागण्यांसाठी हुबळीकडे पदयात्रा करणाऱ्या शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी भेट घेऊन चर्चा केली. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरू असून, आंदोलन शांततेत आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन करून करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
उमेश गाणिगेर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात चिन्नाप्पा पुजारी आणि शशिकांत गुरूजी यांच्यासह शेतकरी सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या तीन प्रमुख मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या तीन प्रमुख मागण्या
- साखरेच्या किमान विक्री दरात (MSP) वाढ करावी.
- कर्नाटकासाठी निश्चित केलेला इथेनॉलचा संपूर्ण कोटा राज्यातील साखर कारखाने आणि इथेनॉल उत्पादकांकडून खरेदी करावा.
- घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या साखरेचे स्वतंत्र वर्गीकरण करून व्यावसायिक साखरेचा दर वाढवावा.
या मागण्यांसंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. मागील आठवड्यात धारवाड आणि हुबळी येथे झालेल्या आंदोलनानंतर केंद्रीय मंत्र्यांनी नवी दिल्ली येथे बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार विविध शेतकरी संघटनांशी संपर्क साधून प्रतिनिधींची यादी तयार करण्यात आली. बैठकीसाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रवासाची आणि आवश्यक व्यवस्थेची जबाबदारीही प्रशासनाने घेतल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
या चर्चेत शेतकऱ्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. सर्व प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडविता येऊ शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रशासनाकडून समन्वयाचे आश्वासन
हुबळीकडे पदयात्रा करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही, अशा पद्धतीने आंदोलन करण्याचे आवाहन केले. जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाच्या सूचनांचे पालन करून आंदोलनाचा पुढील मार्ग निश्चित केला जाईल, अशी ग्वाही आंदोलकांनी दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना नियोजित ठिकाणी पोहोचण्यासाठी आवश्यक सहकार्य केले जाईल. गरज भासल्यास शेजारील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून समन्वय राखला जाईल. शेतकरी संघटनांशी सातत्याने संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू राहतील, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्याचे पालकमंत्री आणि विविध लोकप्रतिनिधींशीही या विषयावर चर्चा सुरू असल्याचे रोशन यांनी स्पष्ट केले.
“शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर योग्य तोडगा शोधून तो त्यांच्यासमोर मांडणे ही जिल्हाधिकारी म्हणून माझी जबाबदारी आहे. ही जबाबदारी मी पूर्ण क्षमतेने पार पाडेन,” असा विश्वास मोहम्मद रोशन यांनी व्यक्त केला.
ऊसदरवाढीसाठी शेतकऱ्यांची पदयात्रा हुबळीकडे सुरू असताना प्रशासनाने चर्चेचा आणि समन्वयाचा मार्ग स्वीकारला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर केंद्र आणि राज्य सरकार कोणता निर्णय घेते, याकडे आता आंदोलनकर्त्यांचे लक्ष लागले आहे.





