belgaum

पोलिस असल्याचे भासवून महिलेचे सोन्याचे दागिने लंपास

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : पोलिस असल्याचे भासवून दोन अज्ञात व्यक्तींनी ७४ वर्षीय महिलेच्या अंगावरील सुमारे ७८ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना बेळगावातील बॉक्‍साईट रोड परिसरात घडली. चोरीला गेलेल्या दागिन्यांची अंदाजे किंमत १२ लाख रुपये असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

थांगम्मा जॉर्ज या १० सप्टेंबर रोजी सकाळी सेंट जोसेफ वर्कर्स चर्च येथे सकाळी ७ वाजताची प्रार्थना आटोपून घरी परतत होत्या. सकाळी सुमारे ७.३५ वाजण्याच्या सुमारास मेझबान हॉलसमोर, सेंट जोसेफ वर्कर्स चर्चजवळ बॉक्‍साईट रोडवर मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवले.

या दोघांनी आपण पोलिस असल्याचे सांगत परिसरात खून झाल्याची माहिती दिली. त्यानंतर महिलेने अंगावर घातलेले सोन्याचे दागिने काढून ठेवण्यास सांगितले. समोरील व्यक्ती पोलिस असल्याचे समजल्याने थांगम्मा जॉर्ज यांनी विश्वास ठेवून रस्त्याच्या कडेला दागिने काढले.

 belgaum

याचाच गैरफायदा घेत दोघांनी दागिने ताब्यात घेतले आणि मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पसार झाले. त्यानंतर थांगम्मा जॉर्ज यांनी सुमारे पाच मिनिटे चालत घरी जाऊन आपल्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.

कुटुंबीयांनी तत्काळ सकाळी सुमारे ८ ते ८.०२ वाजता ११२ क्रमांकावर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन महिलेची माहिती घेतली. हा प्रकार एपीएमसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पुढील तक्रार तेथे नोंदविण्यात आली.

चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये सुमारे ४० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि सुमारे ३८ ते ४० ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या बांगड्यांचा समावेश असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. दागिन्यांचे वजन आणि किंमत अधिकृतरीत्या तपासून पोलिस नोंदीत योग्य प्रकारे नमूद करावी, अशी कुटुंबीयांची मागणी आहे.

या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून, ज्येष्ठ महिलेला पोलिस असल्याचे भासवून दागिने लंपास करणाऱ्या दोन्ही संशयितांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

दरम्यान, अनोळखी व्यक्तींनी पोलिस असल्याचे सांगून दागिने काढण्यास सांगितल्यास नागरिकांनी तातडीने सावध राहावे आणि संबंधित व्यक्तींची ओळख व अधिकृतता तपासल्याशिवाय कोणतेही दागिने काढू नयेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.