बेळगाव लाईव्ह : बेनकनहळ्ळी येथील ४.३६ एकर जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपल्याचा आरोप आणि या प्रकरणात रियाज दस्तगीरसाब चौगुला यांचे नाव समोर आल्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. रियाज चौगुला हे सतीश जारकीहोळी यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात असताना, या प्रकरणावर जारकीहोळी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
बेनकनहळ्ळी येथील सर्व्हे क्रमांक १०३ मधील जमिनीबाबत बनावट जीपीए आणि कागदपत्रांच्या माध्यमातून हक्क हस्तांतरण केल्याचा आरोप महेश देसूरकर यांनी केला आहे. या प्रकरणी लोकायुक्तांकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे. संबंधित कुटुंबीयांनी न्याय मिळावा, अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी केल्याचेही समोर आले आहे.
याबाबत माध्यम प्रतिनिधींनी सतीश जारकीहोळी यांना प्रश्न विचारला असता, “संपूर्ण बेळगावमध्ये जवळपास ५० टक्के प्रकरणे अशीच आहेत. यात काही नवीन नाही,” असे त्यांनी म्हटले.
मात्र, संबंधित जमीन व्यवहारातील कागदपत्रे किंवा प्रकरणाची आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “कोणाचे कागदपत्र बनावट आहेत, कोणाचे खरे आहेत किंवा कोणाचे आहेत, हे मी किंवा तुम्ही सांगून कळणार नाही. आमच्याकडे त्यासंदर्भात कोणतीही कागदपत्रे नाहीत आणि आम्हालाही याबाबत माहिती नाही,” असे जारकीहोळी म्हणाले.
तसेच, बनावट रजिस्ट्रेशन किंवा कागदपत्रांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप असल्यास पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिल्याचेही त्यांनी सांगितले. “अशा प्रकारची प्रकरणे समोर आली की संबंधितांना आम्ही पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितले आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
रियाज चौगुला हे आपले निकटवर्तीय असल्याचे सांगून अशा प्रकारांना संरक्षण दिले जात असल्याच्या चर्चेबाबतही जारकीहोळी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, “त्याला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही कधीही मागे हटलेलो नाही आणि आताही हटणार नाही,” असे स्पष्ट केले.
पोलीस आयुक्तांच्या बदलीवरही जारकीहोळींचे स्पष्टीकरण
दरम्यान, बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या जागी प्रकाश निकम यांची नियुक्ती करण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. निकम यांची नियुक्ती झाली असली तरी त्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. गणेशोत्सवानंतर ते पदभार स्वीकारतील, अशी चर्चा आहे. त्याचवेळी भूषण बोरसे यांची बदली रद्द करण्यात आल्याचीही चर्चा सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना विचारले असता, “याबाबत चर्चा झाली आहे. चर्चा करूनच निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारने आदेश दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला त्या ठिकाणी जावे लागते, असेही त्यांनी सांगितले. मात्र, प्रकाश निकम यांच्या बदलीचा आदेश स्थगित करण्यात आल्याच्या चर्चेबाबत आपल्याला माहिती नसल्याचे जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
“मला त्याबाबत माहिती नाही. आदेश झाला आहे एवढेच मला माहिती आहे. तो स्थगित केला आहे की नाही, याची माहिती नाही. पाहू. सरकारचा निर्णय म्हणजे सरकारचा निर्णय. आपण त्यात काही करू शकत नाही,” असे ते म्हणाले.
पालकमंत्री म्हणून पोलीस आयुक्तांच्या नियुक्तीबाबत आपल्याला माहिती असणे आवश्यक असल्याच्या प्रश्नावर जारकीहोळी यांनी, “मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि त्यांच्याकडे विचारणा करतो,” असे सांगितले.
आयुक्त भूषण बोरसे यांना केवळ १२-१३ महिने झाले असून, अधिकाऱ्याला किमान दोन-तीन वर्षांचा कार्यकाळ मिळावा, अशी चर्चा होत असल्याबाबतही त्यांनी “पाहू. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू,” असे उत्तर दिले.
एकूणच, रियाज चौगुला यांच्याशी संबंधित जमीन प्रकरणात आपल्याला कोणतीही माहिती किंवा कागदपत्रे नसल्याचे सांगत जारकीहोळी यांनी चौकशीसाठी पोलिसांकडे जाण्याची भूमिका मांडली आहे. तर पोलीस आयुक्तांच्या बदलीबाबत सरकारशी चर्चा झाल्याचे सांगत, बदली स्थगित झाली आहे की नाही याबाबत मात्र आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.





