belgaum

सदाशिवनगर स्मशानभूमीच्या समस्यांवर आमदारांची पाहणी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील सदाशिवनगर स्मशानभूमीतील विविध समस्यांची पाहणी उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी केली. स्मशानभूमीतील स्वच्छता, इलेक्ट्रिफिकेशन, पेव्हर ब्लॉक तसेच अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सुविधांची पाहणी करून त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

यावेळी महापालिकेचे अभियंते, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते अमित देसाई, उमेश चौगुले यांच्यासह नागरिकही पाहणीवेळी उपस्थित होते.

स्वच्छता आणि सुविधांवर भर

यावेळी बोलताना उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी सांगितले की, सदाशिवनगर स्मशानभूमीत स्वच्छतेसोबतच इलेक्ट्रिफिकेशन आणि पेव्हर ब्लॉकची कामे करण्यात येणार आहेत. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

 belgaum

“ज्याप्रमाणे आपण जिवंत असताना स्वाभिमानाने आणि चांगल्या वातावरणात जीवन जगण्याची अपेक्षा करतो, त्याचप्रमाणे अंतिम यात्रेत येणाऱ्या नागरिकांनाही योग्य सुविधा मिळायला हव्यात. अंतिम प्रवासासाठी येणाऱ्या व्यक्तीलाही सन्मान मिळावा, यासाठी स्मशानभूमीत स्वच्छ आणि सुंदर वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे,” असे आमदार आसिफ सेठ यांनी सांगितले.

डंपिंग ग्राऊंडसदृश परिस्थितीबाबत चिंता

सामाजिक कार्यकर्ते अमित देसाई यांनी सांगितले की, बेळगावातील विविध समस्या उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या निदर्शनास आणून देताना सदाशिवनगर स्मशानभूमीतील अस्वच्छतेचा प्रश्नही मांडण्यात आला होता.

“स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. काही ठिकाणी मोबाईल व्हॅन पार्क केल्या जातात. तसेच स्मशानभूमीचा वापर डंपिंग ग्राऊंडसारखा होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रथम स्वच्छतेची व्यवस्था करावी, अशी विनंती आमदारांना केली होती,” असे अमित देसाई यांनी सांगितले.

सध्याची लोकसंख्या आणि मृत्यूदर लक्षात घेता स्मशानभूमीतील अंत्यसंस्कारासाठी असलेल्या शेड्सची संख्याही अपुरी पडत असल्याचे त्यांनी नमूद केले. हिंदू धर्माच्या प्रथेनुसार काही दिवसांनंतर राख संकलित केली जात असल्याने जागेची कमतरता जाणवत असल्याचेही त्यांनी सांगितले.

या समस्यांची पाहणी करण्यासाठी आमदार आसिफ सेठ यांनी तत्काळ स्मशानभूमीला भेट दिली. यावेळी त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांनाही सोबत घेत परिस्थितीची पाहणी केली. अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे अमित देसाई यांनी सांगितले.

प्रशासनाने डंपिंगवर कारवाई करावी

MNM

“स्मशानभूमी हा प्रत्येकाच्या अंतिम प्रवासाचा भाग आहे. त्यामुळे नागरिकांनीही स्वच्छता राखली पाहिजे. प्रशासनाकडून आवश्यक असलेली मदत घेऊन स्मशानभूमीची व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. स्मशानभूमीत डंपिंग ग्राऊंडसदृश परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्यावर प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत,” अशी मागणी अमित देसाई यांनी केली.यावेळी विजय पावशे, राजू कंग्राळकर, विक्रम पाटील, संदीप मुतगेकर,विनायक शिंदे, अनंत पाटील, आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.