बेळगाव लाईव्ह : गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपल्याने बेळगाव शहरातील मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी होत आहे. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागातील मारुती गल्लीसह प्रमुख मार्गांवर भटक्या जनावरांनी ठाण मांडल्याने गंभीर वाहतूक कोंडी निर्माण होत असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरासह शेजारील महाराष्ट्र आणि गोव्यातून हजारो नागरिक खरेदीसाठी बाजारपेठेत दाखल होत आहेत. त्यातच शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस असल्याने मारुती गल्ली, खडेबाजार, पांगुळ गल्ली आणि गणपत गल्ली परिसरात खरेदीदारांची प्रचंड गर्दी झाली आहे. अशा वेळी रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसणारी आणि अचानक समोर येणारी भटकी जनावरे वाहतुकीला मोठा अडथळा ठरत आहेत.
एकीकडे बेळगाव शहरात विविध विकासकामे, रस्ते आणि गटारींच्या कामासाठी ठिकठिकाणी खोदकाम करून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आधीच रस्ते अरुंद झाले असून वाहतूक कोंडीची समस्या तीव्र बनली आहे. त्यातच भटक्या जनावरांच्या वाढत्या उपद्रवामुळे अपघाताची टांगती तलवार निर्माण झाली असून, खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना व वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
आधीच खोदलेले रस्ते, त्यात वाहतूक कोंडी आणि आता भटक्या जनावरांचा उपद्रव यामुळे नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे बेळगाव महानगरपालिका प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन शहरातील भटक्या जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिक व व्यापाऱ्यांमधून केली जात आहे.





