belgaum

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलिसांचा रौडी परेड

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: शहरातील भव्य गणेशोत्सवाला सुरुवात होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना बेळगाव पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात शांतता भंग करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कृत्याची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिस आयुक्त प्रकाश निकम यांनी दिला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी शहरातील पोलिस कवायत मैदानावर सक्रिय रौडीशिटरांची परेड घेण्यात आली. पोलिस आयुक्त प्रकाश निकम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या परेडमध्ये शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील १२५ हून अधिक सक्रिय रौडीशिटर सहभागी झाले.

यावेळी पोलिसांनी रौडीशिटरांच्या सध्याच्या हालचाली, त्यांच्या संपर्कातील व्यक्ती आणि हाती असलेल्या प्रकरणांबाबत माहिती घेतली. गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यात सहभागी होऊ नये, तसेच गोंधळ, मारामारी, धमकी किंवा सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

 belgaum

मार्केट, माळमारुती, एपीएमसी, कॅम्प यांसह शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील रौडीशिटर परेडमध्ये उपस्थित होते. याशिवाय ग्रामीण, शहापूर, उद्यमबाग आणि मारीहाळ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील रौडीशिटरांनाही पोलिसांकडून कडक इशारा देण्यात आला.

गणेशोत्सव हा शांतता, सौहार्द आणि उत्साहात साजरा झाला पाहिजे. उत्सवाच्या नावाखाली गोंधळ घालणे, नागरिकांना धमकावणे, बेकायदेशीर कृत्य करणे किंवा सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात शहरातील प्रमुख रस्ते, गणेश मंडप, मिरवणुकीचे मार्ग आणि संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्याची तयारी सुरू आहे. रौडीशिटरांच्या हालचालींवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना पोलिस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत.

नूतन पोलिस आयुक्त म्हणून प्रकाश निकम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या या रौडी परेडमधून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेबाबत बेळगाव पोलिसांचा कठोर पवित्रा स्पष्ट झाला आहे. रौडीशिटर असो किंवा अन्य कोणतीही व्यक्ती—कायद्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.