belgaum

उगार शुगरवरील ‘क्लोजर’ आदेश मागे घ्या;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कागवाड तालुक्यातील उगार खुर्द येथील उगार शुगर फॅक्टरीला बंद करण्याबाबत (क्लोजर) जारी करण्यात आलेला आदेश तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी करत उगार गावातील नागरिक, कारखान्यातील कर्मचारी आणि कामगारांनी आज बेळगाव येथे आरसी कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले.

कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने 3 सप्टेंबर 2026 रोजी उगार शुगर कारखान्याबाबत क्लोजर नोटीस जारी केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे कारखान्यावर अवलंबून असलेल्या हजारो कामगारांच्या कुटुंबांवर तसेच शेतकरी, व्यापारी आणि परिसरातील नागरिकांवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, सुमारे 4,500 कामगार कुटुंबे तसेच 70 ते 85 हजार शेतकरी कुटुंबे, व्यापारी आणि आसपासच्या गावांतील नागरिक या कारखान्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अवलंबून आहेत. उगार खुर्द नगरपालिकेच्या हद्दीत 40 हजारांहून अधिक लोकसंख्या असून, कारखाना बंद झाल्यास हातगाडीवाले, हमाल आणि इतर छोट्या व्यावसायिकांवरही गंभीर आर्थिक परिणाम होईल, असा दावा नागरिकांनी केला आहे.

 belgaum

उगार शुगर कारखान्याला 85 वर्षांचा इतिहास असून तो देशातील प्रतिष्ठित साखर कारखान्यांपैकी एक आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. पर्यावरण प्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करण्यासाठी कारखान्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून, प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित छायाचित्रे, व्हिडिओ आणि कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्यांना सादर केल्याचे नागरिकांनी सांगितले.

तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारखाना परिसराची पाहणी करून अहवाल सादर केले आहेत. मात्र, अचानक क्लोजर नोटीस बजावल्याने कामगार आणि नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असल्याचे निवेदनात नमूद आहे.

क्लोजर नोटीस तातडीने रद्द करून कारखाना सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

दरम्यान, आदेश मागे न घेतल्यास कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. पुढील काळात उगार गाव, कागवाड तालुका तसेच बेळगाव जिल्हा बंद करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी व्यक्त केली.

“UNITY IS STRONG” असा संदेश देत कामगार, शेतकरी आणि नागरिकांनी एकजुटीने या निर्णयाविरोधात लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.