बेळगाव लाईव्ह : ढोर गल्ली येथे भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्यानंतर भाजप कर्नाटक प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी शनिवारी घटनास्थळी भेट देत कुटुंबीयांची विचारपूस केली. यावेळी भाजपच्या वतीने दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला १ लाख रुपयांची मदत देण्यात आली.
“एकाच कुटुंबातील सहा सदस्यांनी आगीत जीव गमावला आहे. अशा परिस्थितीत कायदेशीर किंवा तांत्रिक अडचणींच्या कारणामुळे मदत थांबू नये. मानवतेच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने या कुटुंबाला तातडीने मदत करावी,” अशी मागणी विजयेंद्र यांनी केली.
विजयेंद्र यांनी घटनास्थळाची पाहणी करून दुर्घटनेची माहिती घेतली. फ्रिजमधील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. एका गरीब कुटुंबातील सहा सदस्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याने ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विरोधी पक्षनेते आर. अशोक, माजी आमदार अनिल बेनके, रवी पाटील आणि मुरगेंद्र पाटील उपस्थित होते.

दरम्यान, नुकसानभरपाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचे स्थानिक नेत्यांनी सांगितले. घरातील फ्रिजमधील बिघाडामुळे दुर्घटना घडल्याने सध्याच्या नियमांनुसार शासकीय मदत देण्यात अडचण असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
याप्रकरणी आवश्यक पत्र देऊन शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असून, मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने मानवतेच्या दृष्टिकोनातून कुटुंबाला तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी विजयेंद्र यांनी केली.
“या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्यासह सरकारकडे पाठपुरावा करू,” असेही विजयेंद्र यांनी सांगितले.





