belgaum

गणरायाच्या आगमनातून बंधुभावाचा संदेश;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : गणेश चतुर्थीच्या उत्साहात संपूर्ण बेळगाव शहर भक्तिमय झाले असताना, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी गणरायाच्या आगमनातून सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश दिला.

सर्कल येथील गणेश मंदिरात भक्तिभावाने पूजा केल्यानंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी गणपतीची मूर्ती स्वतः चालत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणली. त्यानंतर कार्यालयात गणरायाची विधिवत स्थापना व पूजन करण्यात आले.

यावेळी बोलताना मोहम्मद रोशन म्हणाले, “बेळगाव शहर आणि जिल्ह्यात बंधुभाव आणि शांतता कायम राहावी, यासाठी कोणताही धर्माचा सण असो, आपण सर्वांनी एकत्र येऊन तो साजरा केला पाहिजे.”

गेल्या दोन वर्षांपासून जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असल्यापासून गणेश चतुर्थीच्या निमित्ताने याच गणेश मंदिरात येऊन पूजा करत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यालय तसेच जिल्हाधिकारी निवासस्थानी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 belgaum

“हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिस्ती—आपण सर्व एक आहोत. आपण सर्व भारतीय आहोत. ईद-ए-मिलाद असो किंवा गणेश चतुर्थी, प्रत्येकाच्या सणात आपण सहभागी झालो पाहिजे,” असा संदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

दरम्यान, बेळगाव शहरासह ग्रामीण भागातही घरगुती गणपतीच्या आगमनाची मोठी लगबग पाहायला मिळाली. ढोल-ताशांचा गजर, गणरायाचा जयघोष आणि भक्तिमय वातावरणात नागरिकांनी बाप्पाचे उत्साहात स्वागत केले.

“एकमेकांच्या आनंदात आणि दुःखात सहभागी झालो, तरच बंधुभाव अधिक दृढ होतो. बेळगाव हे याचे उत्तम उदाहरण आहे. हा बंधुभाव आणि शांतता सदैव कायम राहो,” अशी अपेक्षा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी व्यक्त केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.