belgaum

‘नीट’नंतर प्रशासन सतर्क; बेळगावात पोलीस भरती परीक्षा शांततेत

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: कर्नाटक राज्यातील ३,९९१ पोलीस कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी रविवारी राज्यभर एकाच वेळी लेखी परीक्षा पार पडली. बेळगाव जिल्ह्यातही विविध परीक्षा केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्थेत परीक्षा घेण्यात आली. ‘नीट’ पेपरफुटीच्या घटनेनंतर देशातील सर्वच स्पर्धा परीक्षांकडे नागरिक, विद्यार्थी आणि प्रशासनाचे विशेष लक्ष लागले असल्याने या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाच्या (KEA) वतीने परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परीक्षेपूर्वी मुख्यमंत्री, मुख्य सचिव, सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्त यांची बैठक घेऊन कोणताही गैरप्रकार होणार नाही यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या होत्या.

बेळगाव जिल्ह्यात एकूण २५,१६४ उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यासाठी बेळगाव शहरात ४६, तर चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात १५ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षा केंद्रांची पायाभूत सुविधा, बैठक व्यवस्था आणि सुरक्षा याची प्रशासनाने पूर्वतपासणी केली होती.

 belgaum

परीक्षेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही आणि फेशियल रेकग्निशन कॅमेरे बसविण्यात आले होते. उमेदवारांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला होता. तसेच ब्लूटूथ किंवा इतर सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर रोखण्यासाठी जिल्हाभरात ६४ ईएनटी (ENT) पॅरामेडिकल पथके तैनात करण्यात आली होती. प्रत्येक उमेदवाराची कसून तपासणी (फ्रिस्किंग) केल्यानंतरच परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला.

ग्रामीण भागासह इतर ठिकाणांहून येणाऱ्या उमेदवारांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक, सुरक्षा आणि इतर सुविधांचे नियोजन करण्यात आले होते. पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या समन्वयातून बेळगाव जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा शांततेत आणि सुरळीत पार पडल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.