belgaum

ओल्ड पीबी रोडवर ट्रॅफिक जाम!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील ओल्ड पीबी रोड आणि एसपीएम रोडला जोडणाऱ्या रुपाली थिएटर परिसरातील चौकात गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर बनली आहे. विशेषतः अवजड वाहनांची वाढलेली वर्दळ, बस वाहतूक आणि शाळा सुटण्याची वेळ एकत्र आल्याने या परिसरात वारंवार ट्रॅफिक जॅम होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.

भातकांडे स्कूल परिसरातून एसपीएम रोडमार्गे ओल्ड पीबी रोडला जोडणाऱ्या रस्त्यावर हुबळी-धारवाडकडे जाणाऱ्या बसेससह टँकर, ट्रक आणि इतर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. त्यामुळे अरुंद चौकात वाहतुकीचा ताण वाढून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

स्थानिक नागरिकांच्या मते, शनिवारच्या दिवशी ही समस्या अधिकच तीव्र होते. कपिलेश्वर पूल आणि शनी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढते. त्याच वेळी शाळा सुटल्यामुळे विद्यार्थी, पालक आणि इतर वाहनांची संख्याही वाढते. या गर्दीत एखादा ट्रक किंवा टँकर चौकात आल्यास संपूर्ण वाहतूक ठप्प होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

 belgaum

नागरिकांनी प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे. चौकात वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी पोलिसांची नियुक्ती करावी, अवजड वाहनांच्या प्रवेशासाठी वेळेचे नियोजन करावे आणि वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या चौकातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. प्रशासन याबाबत कोणती पावले उचलते, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.