बेळगाव लाईव्ह : निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयाजवळ पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग (एनएच-४८) सहापदरीकरणाच्या कामादरम्यान कोसळलेल्या रिटेनिंग वॉलची (आधारभिंत) पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) दिल्ली येथील तांत्रिक तज्ज्ञ पथकाने शनिवारी घटनास्थळी भेट दिली.
२९ जुलै रोजी बांधकामाधीन उड्डाणपुलाच्या अॅप्रोच भागातील रिटेनिंग वॉलचा काही भाग कोसळला होता. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर केंद्रातून तज्ज्ञ पथक पाठविण्यात आले.
एनएचएआयचे बेंगळुरू विभागाचे महाव्यवस्थापक ब्रह्मंकर यांनी सांगितले की, दिल्लीतील पथकाने अत्याधुनिक चाचणी उपकरणांच्या साहाय्याने भिंतीच्या गुणवत्तेची आणि बांधकामाची सखोल तपासणी केली. घटनास्थळावरील तांत्रिक माहिती संकलित करण्यात आली असून तिचे विश्लेषण केल्यानंतर अंतिम अहवाल सादर करण्यात येणार आहे.
या घटनेनंतर काही काळ थांबविण्यात आलेले सहापदरीकरणाचे काम आता पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्राथमिक तपासात मुसळधार पावसामुळे अॅप्रोच भागात पाणी झिरपून मातीची धूप झाल्याने आणि रस्त्याचे अंतिम डांबरीकरण होण्यापूर्वीच आधारभिंत कोसळल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, या प्रकरणात निष्काळजीपणा आढळल्याने एनएचएआयने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. प्रकल्प संचालक, ब्रिज इंजिनिअर आणि निवासी अभियंता यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले असून संबंधित कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. गुणवत्ता तपासणीचा अंतिम अहवाल आल्यानंतर आवश्यकतेनुसार आणखी कठोर कारवाई केली जाणार असल्याचे एनएचएआयने स्पष्ट केले आहे.
नवीन बांधण्यात येत असलेली आधारभिंत महामार्ग पूर्ण होण्यापूर्वीच कोसळल्याने या प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि चिंता व्यक्त होत आहे.





