बेळगाव लाईव्ह: 2019 मध्ये बेळगाव तालुक्यातील होनियाळ (होन्निहाळ) गावात झालेल्या पूर्ववैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणात तिसऱ्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सात आरोपींना दोषी ठरवले आहे. मात्र, खटल्याच्या सुनावणीदरम्यान एका आरोपीचा मृत्यू झाल्याने उर्वरित सहा दोषींना 6 ऑगस्ट 2026 रोजी शिक्षा सुनावली जाणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2019 रोजी होन्निहाळ येथील मनियार लेआउटमध्ये पूर्ववैमनस्यातून वाद झाला होता. या वादानंतर सात आरोपींनी मिळून नागेंद्र बसाप्पा मेकलगोल (रा. सुळेभावी) यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
जीव वाचवण्यासाठी नागेंद्र यांनी जवळील एका शेडमध्ये जाऊन आतून दरवाजा बंद केला. मात्र, आरोपींनी शेडचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि तलवार तसेच इतर धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात नागेंद्र यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर मारीहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
दोषी ठरलेले आरोपी
- यल्लेशी महादेव तानुगोल (24)
- राघवेंद्र तुकाराम कम्मार (23)
- विशाल विठ्ठल हुदली (19)
- किरण मल्लेशी मिसाळे
- चेतन विजय कवडी
- राघवेंद्र अदृश्यप्पा दानप्पा (22)
- महेश रणधीर रामचंद्र मुरारी (24) – खटल्यादरम्यान मृत्यू
सर्व आरोपी हे बेळगाव तालुक्यातील सुळेभावी गावचे रहिवासी आहेत. आरोपी महेश मुरारी यांचा खटल्यादरम्यान मृत्यू झाल्याने सध्या जिवंत असलेल्या उर्वरित सहा दोषींना 6 ऑगस्ट 2026 रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. आर. जी. देवरेड्डी यांनी बाजू मांडली.





