belgaum

खोकला हा आजार नाही, तर अनेक आजारांचे लक्षण!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : खोकला हा स्वतःमध्ये आजार नसून शरीरातील विविध आजारांचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. त्यामुळे खोकल्याकडे दुर्लक्ष न करता त्यामागील कारण शोधून योग्य उपचार घेणे आवश्यक असल्याचे मत होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी एका जनजागृतीपर व्हिडिओद्वारे खोकल्याचे प्रकार, त्यामागील कारणे आणि उपचारांविषयी माहिती दिली.

डॉ. सरनोबत यांच्या मते, खोकल्याचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. अॅक्युट (अल्पकालीन) खोकला हा ऋतू बदल, पावसात भिजणे, व्हायरल संसर्ग, फ्लू किंवा अॅलर्जीमुळे होतो. थंड पाणी, थंड हवा किंवा काही विशिष्ट पदार्थांमुळेही हा त्रास होऊ शकतो. अशा वेळी सर्दी, नाक वाहणे आणि शिंका येणे ही लक्षणे दिसून येतात.

तर क्रॉनिक (जुनाट) खोकला हा निमोनिया, दमा, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस किंवा फुफ्फुसांच्या इतर गंभीर आजारांमुळे दीर्घकाळ टिकून राहू शकतो. याशिवाय शिक्षक, व्याख्याते किंवा सतत बोलणाऱ्या व्यक्तींमध्ये स्वरयंत्रावर ताण आल्याने, तसेच बंद किंवा धुळीच्या वातावरणामुळेही खोकल्याचा त्रास होऊ शकतो.

 belgaum

स्वतःच्या मनाने औषधे घेणे धोकादायक

कोविडनंतर अनेक जण डॉक्टरांचा सल्ला न घेता अँटीबायोटिक्स किंवा अँटी-अॅलर्जिक औषधे स्वतःहून घेत असल्याबद्दल डॉ. सरनोबत यांनी चिंता व्यक्त केली. योग्य निदान आणि उपचार न घेतल्यास खोकला अधिक गंभीर होऊन छातीचे किंवा कान-नाक-घसा (ईएनटी) संबंधित संसर्ग वाढू शकतात. काही रुग्णांमध्ये धाप लागणे, कान-नाक बंद होणे किंवा इतर गुंतागुंतही निर्माण होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

होमिओपॅथी उपचारांबाबत दावा

डॉ. सरनोबत यांच्या म्हणण्यानुसार, दीर्घकाळ टिकणारा खोकला, दमा तसेच काही फुफ्फुसांच्या आजारांमध्ये होमिओपॅथी उपचारांचा उपयोग होऊ शकतो. लहान मुलांमधील दम्याची लक्षणे तसेच गर्भवती महिलांमध्ये खोकल्याच्या तक्रारींसाठीही होमिओपॅथी हा सुरक्षित पर्याय असल्याचा दावा त्यांनी केला.

स्टिरॉइड्सबाबतचा गैरसमज दूर करण्याचे आवाहन

होमिओपॅथी औषधांमध्ये स्टिरॉइड्स असतात, हा गैरसमज असल्याचे सांगत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार करावेत, असे आवाहन डॉ. सोनाली सरनोबत यांनी केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.