बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात एकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे काही भागात पावसाची उघडीप अशी परिस्थिती असतानाच कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झालेल्या वाढीमुळे रायबाग तालुक्यातील कुडची-उगारखुर्द संपर्क पूल रविवारी पुन्हा एकदा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे जामखंडी-मिरज राज्य महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
रायबाग तालुक्यातील कुडची आणि महाराष्ट्रातील उगारखुर्द यांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा जलमय झाला आहे. विशेष म्हणजे, चिकोडी उपविभागात यंदा पुराच्या पाण्याखाली गेलेला हा आठवा पूल ठरला आहे.
हा पूल कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने दररोज शेकडो बस, ट्रक आणि इतर वाहने या मार्गाने प्रवास करतात. मात्र पूल पाण्याखाली गेल्याने वाहनचालकांना सुमारे ५० किलोमीटरचा वळसा घेऊन पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत आहे.

दरम्यान, कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी कुडची पोलिसांनी पुलाच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स उभारून वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे.
प्रशासनाकडून पुरस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.





