belgaum

दवाखान्याला कुलूप; जनावरांचे हाल!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : : वडगाव व जुने बेळगाव परिसरातील पशुपालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना कर्मचारीअभावी बंद असल्याने शेतकरी व पशुपालकांची मोठी गैरसोय होत आहे. दवाखान्याच्या इमारतीला कुलूप असल्याने आजारी जनावरांवर वेळेत उपचार मिळणे कठीण झाले आहे. संबंधित विभागाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन दवाखान्यात कायमस्वरूपी पशुवैद्यक तसेच प्रशिक्षित सहाय्यकांची नियुक्ती करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील पशुपालकांतून होत आहे.

वडगाव आणि जुने बेळगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पशुधन असून, अनेक शेतकरी बैल, गायी, म्हशी, शेळ्या यांचे पालन करतात. त्याचबरोबर कुत्रे व मांजरे पाळणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. पशुधन हे अनेक शेतकरी कुटुंबांच्या उपजीविकेचे महत्त्वाचे साधन असल्याने त्यांच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी स्थानिक पातळीवर पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे.

वडगाव येथील चावडीच्या जागेत गेल्या अनेक वर्षांपासून पशुवैद्यकीय दवाखाना सुरू होता. या दवाखान्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना जनावरांच्या आजारांवर उपचार, औषधोपचार तसेच अन्य आवश्यक पशुवैद्यकीय सेवा सहज उपलब्ध होत होत्या. पूर्वी येथे एक पशुवैद्यक आणि त्यांच्यासोबत दोन प्रशिक्षित सहाय्यक कार्यरत होते. त्यामुळे जनावरांना तातडीने उपचार मिळत असल्याने पशुपालकांना मोठा दिलासा मिळत होता.

 belgaum

मात्र, पूर्वी कार्यरत असलेल्या पशुवैद्यकांची बदली झाल्यानंतर नवीन पशुवैद्यकाची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येते. तरीही प्रत्यक्षात दवाखान्यात गेल्यावर त्याला कुलूप असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नवीन नियुक्ती झाली असेल तर त्याचा लाभ पशुपालकांना मिळत का नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जनावर आजारी पडल्यास किंवा त्याला दुखापत झाल्यास वेळेत उपचार मिळणे अत्यंत गरजेचे असते. उपचारास विलंब झाल्यास जनावराची प्रकृती गंभीर होण्याबरोबरच शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना असूनही तो बंद अवस्थेत राहणे ही गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

खासगी ठिकाणी उपचार करून घेण्यासाठी पशुपालकांना मोठा खर्च करावा लागतो. आधीच शेती व पशुपालनाच्या वाढत्या खर्चामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना हा अतिरिक्त खर्च परवडणारा नाही. त्यामुळे वडगावचा पशुवैद्यकीय दवाखाना नियमितपणे सुरू राहणे ही परिसरातील शेतकऱ्यांची अत्यावश्यक गरज बनली आहे.

दवाखाना नियमित सुरू ठेवण्याची मागणी
संबंधित विभागाने वडगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कायमस्वरूपी पशुवैद्यक आणि प्रशिक्षित सहाय्यकांची नियुक्ती करून दवाखाना नियमितपणे सुरू ठेवावा. तसेच जनावरांना आवश्यक उपचार व औषधोपचार वेळेत मिळतील, याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी नेते राजू मरवे, वडगाव कृषी पत्तीनंचे संचालक संतोष शिवनगेकर व पशुपालकांनी केली आहे.

प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास येत्या काही दिवसांत संबंधित विभागाच्या कार्यालयावर धडक देऊन धरणे आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून वडगावचा पशुवैद्यकीय दवाखाना तातडीने सुरू करावा, अशी मागणी जोर धरत आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.