बेळगाव लाईव्ह : बेळगाव कॅन्टोन्मेंट परिसरातील प्रमुख रस्ते लष्कराकडे हस्तांतरित करणे आणि बॅरिकेड्स उभारण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शवत बेळगाव कॅन्टोन्मेंट रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे १४,१३६ नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम हरी मंचलवार यांना सादर करण्यात आले.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या १७ जुलैच्या बैठकीतील ठराव क्र. २६ व २७ नुसार अल्बर्ट एक्का रस्ता, स्मार्ट रस्ता आणि क्वीन्स गार्डन रस्ता लष्कराकडे वर्ग करणे तसेच इंडिपेंडन्स रस्ता व जिमखाना रस्त्यावर उंच बॅरिकेड्स उभारण्याचा प्रस्ताव आहे. या निर्णयामुळे नागरिक, विद्यार्थी व व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय होणार असल्याने १४ हजारहून अधिक सह्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
याप्रकरणी कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम हरी मंचलवार यांनी प्रतिक्रिया दिली. नागरिक आणि असोसिएशनतर्फे १४ हजारहून अधिक सह्यांचे निवेदन प्राप्त झाले असून, त्यात रस्ते हस्तांतरण व बॅरिकेड्स उभारणीस विरोध दर्शवला आहे. बोर्डाच्या आगामी बैठकीत सर्व घटकांचा आणि कायदेशीर बाजूंचा सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सुदाम हरी मंचलवार यांनी म्हटले.

याप्रसंगी बोलताना माजी आमदार अनिल बेनके यांनी आपली भूमिका मांडली. कॅन्टोन्मेंटमधील तीन प्रमुख रस्ते बंद करणे आणि बॅरिकेड्स घालणे हा नागरिकांवर अन्याय आहे. याआधीही दोन वेळा न्यायालयात लढा देऊन नागरिकांनी आपले हक्क मिळवले आहेत. त्यामुळे प्रशासनाने या निवेदनाची दखल घेऊन रस्ते खुले ठेवावेत आणि नागरिकांना दिलासा द्यावा, असे अनिल बेनके यांनी म्हटले.
यावेळी माजी आमदार अनिल बेनके, बेळगाव कॅन्टोन्मेंट रेसिडेन्शियल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष फारुक नवाब, सचिव रंजन शेट्टी, डॉ. नितीन खोत, अजय पै, साजिद शेख, कॅन्टोन्मेंट सदस्य सुधीर तुपेकर, डॉ. सोनाली खोत, डॉ राहिला शेख, नयना नेरली, ॲड. सुलतानपुरे आणि बार असोसिएशनच्या प्रतिनिधींसह कॅन्टोन्मेंट परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





