belgaum

‘त्या’ सायकल शोरूमबाहेर अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील पीबी रोडवरील एका सायकल शोरूमबाहेरील अस्ताव्यस्त पार्किंगमुळे स्थानिक नागरिकांसह परिसरातील व्यापारी आणि लघुउद्योजकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रस्त्यालगत होणाऱ्या पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सायकल शोरूमच्या पाठीमागील बाजूस असलेल्या घरांमध्ये जाण्यासाठी अरुंद रस्त्याचा वापर केला जातो. मात्र, शोरूममध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांकडून या रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने स्थानिक नागरिकांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार आहे.

याच मुद्द्यावरून सोमवारी शोरूम कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये वाद झाला. यावेळी शोरूम कर्मचाऱ्यांकडून शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला. परिस्थिती चिघळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

 belgaum

दरम्यान, पीबी रोडवरील अस्ताव्यस्त पार्किंगचा फटका आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनाही बसत असल्याचे सांगण्यात येत आहे. ग्राहकांची वाहने इतर दुकानांसमोर उभी राहत असल्याने व्यवसायावर परिणाम होत असल्याची व्यापाऱ्यांची तक्रार आहे. तसेच शोरूममध्ये विक्रीसाठी आलेल्या नवीन सायकली रस्त्यावरच मांडल्या जात असल्याने वाहतुकीला आणखी अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

याप्रकरणी बोलताना राहुल मुचंडी यांनी पीबी रोडवरील वाहतूक आणि पार्किंगच्या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची मागणी केली. कापलेश्वरी कॉलनीकडे जाणारा मार्ग तसेच बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याचे त्यांनी सांगितले. कापलेश्वरी ओव्हरब्रिज आणि छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल परिसरातही दिवसातून अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक व व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. रस्त्यावर होणारे अनधिकृत किंवा अडथळा निर्माण करणारे पार्किंग हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.