belgaum

१९,०२४ फूटांवर ऐश्वर्या बेळगावच्या लेकीची अभिमानास्पद कामगिरी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : प्रबळ इच्छाशक्ती, साहसाची आवड आणि काहीतरी वेगळं करण्याची जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते, हे बेळगावच्या ऐश्वर्या उदयकुमार देसाई यांनी सिद्ध करून दाखवले आहे. बालपणापासूनचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी तब्बल २,००० किलोमीटरहून अधिक अंतराची खडतर लडाख बायकिंग राईड यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. जगातील सर्वाधिक उंचीवरील रस्त्यांपैकी एक असलेल्या १९,०२४ फुटांवरील ‘उमलिंग ला’ पासवर पोहोचून त्यांनी बेळगावच्या अभिमानात मोलाची भर घातली आहे.

ऐश्वर्या देसाई या मूळच्या बेळगावच्या असून त्यांचे शालेय शिक्षण ‘महिला विद्यालय मराठी माध्यम शाळेत झाले आहे. सध्या त्या शाहूनगर येथे वास्तव्यास असून इंडसइंड बँकेत व्यवस्थापिका (Chief Manager) म्हणून कार्यरत आहेत. नोकरीची जबाबदारी सांभाळत असतानाच, प्रवास आणि साहसाची असलेली आवड त्यांना गप्प बसू देत नव्हती. लडाखची भटकंती करणे हे त्यांचे लहानपणापासूनचे स्वप्न होते.

हेच स्वप्न मनाशी बाळगून ७ जून ते १७ जून २०२६ दरम्यान चाललेल्या या ११ दिवसांच्या मोहिमेत त्या ३० जणांच्या समूहासोबत सहभागी झाल्या होत्या. ‘रॉयल एनफिल्ड हिमालयन ३५०’ बाईकवरून पिलियन रायडर म्हणून त्यांनी हा थरारक प्रवास पूर्ण केला. मनालीपासून सुरू झालेला हा प्रवास जिस्पा, सरचू, लेह, नुब्रा व्हॅली, खारदुंग ला, पँगॉन्ग लेक, रेझांग ला, हानले, उमलिंग ला, कारगिल आणि शेवटी श्रीनगर असा २,००० किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा होता. हिमालयातील निसर्गरम्य पण अत्यंत धोकादायक आणि आव्हानात्मक रस्त्यांवरून त्यांनी हा टप्पा गाठला.

 belgaum

कमी ऑक्सिजनची पातळी, सातत्याने बदलणारे टोकाचे हवामान आणि हिमालयातील कठीण रस्ते यांसारख्या अनेक आव्हानांचा सामना करत त्यांनी हा प्रवास पूर्ण केला. या प्रवासातील १९,०२४ फूट उंचीवरील ‘उमलिंग ला’ पासवर पोहोचणे हा त्यांच्यासाठी सर्वात अभिमानास्पद आणि अविस्मरणीय क्षण ठरला. याशिवाय, खगोलशास्त्र आणि वैज्ञानिक संशोधनासाठी महत्त्वाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या ‘हानले’ गावाला दिलेली भेट ही त्यांच्यासाठी सर्वात खास आठवण ठरली.

“या प्रवासाने मला आत्मविश्वास, धैर्य, स्वावलंबन आणि संयम शिकवला. स्वतःच्या भीतीवर मात करत निसर्गाशी एक वेगळे नाते जोडता आले,” अशा शब्दांत ऐश्वर्या यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी तरुण पिढीला आणि विशेषतः महिलांना संदेश देताना म्हटले की, “महिलांनी आणि तरुणांनी आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून, भीती बाजूला सारून स्वतःची स्वप्ने पूर्ण केली पाहिजेत. प्रवास म्हणजे केवळ नवीन जागा पाहणे नव्हे, तर स्वतःचा शोध घेणे आणि स्वतःमधील आत्मविश्वास वाढवणे होय.” असे सांगत कित्येक तरुणी आणि महिलांसाठी साहसाचा संदेश दिला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.