बेळगाव लाईव्ह : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपनगरातील गणेश विसर्जन तलावांची बुधवारी सकाळी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पाहणी केली. यावेळी गणेश महामंडळाचे जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी यांच्यासह संबंधित ठिकाणांची पाहणी करून विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
गणेशमूर्ती विसर्जनावेळी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन तलावांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि आवश्यक सुविधांची पाहणी करण्यात आली.
पाहणीदरम्यान शिवसृष्टीजवळील एम.एफ. रोडवरील श्री शिवाजी गार्डन येथील मोठी चौकोनी विहीर येथे प्रस्तावित विसर्जन स्थळाची पाहणी करण्यात आली. तसेच जुने बेळगाव येथील श्री कलमेश्वर मंदिर तलाव, वडगाव रोडवरील जुनी जेल विहीर आणि अनगोळ येथील नाथ पै नगरमधील धब्बू तलाव व विठ्ठल मंदिर विहीर या ठिकाणांचाही आढावा घेण्यात आला.

गणेशोत्सवादरम्यान कोणतीही गैरसोय किंवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून विसर्जन स्थळांवर आवश्यक नियोजन केले जात आहे. भाविकांनीही विसर्जनावेळी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, काल पोलीस आयुक्तांनी रात्रीच्या पावसात वडगाव परिसरातील विसर्जन तलावाची पाहणी केली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी उपनगरातील इतर प्रस्तावित तसेच जुन्या विसर्जन स्थळांची पाहणी करण्यात आली. त्यामुळे यंदाच्या गणेश विसर्जनासाठी प्रशासनाकडून स्थळनिहाय तयारीला वेग आला आहे.





