belgaum

खानापूर निडगलचा नारायण निघाला अट्टल दुचाकी चोरटा!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : एखादी दुचाकी चोरीला गेल्यानंतर तिचा शोध घेणे म्हणजे पोलिसांसाठी मोठे आव्हान. मात्र, कित्तूर पोलिसांनी केलेल्या तपासात दुचाकी चोरीचे एक मोठे जाळेच उघडकीस आले आहे. खानापूर तालुक्यातील निडगल गावचा ३२ वर्षीय नारायण मनोहर कदम हा गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दुचाकी चोरत असल्याचे तपासात समोर आले आहे.

कित्तूर एपीएमसी गेटजवळून दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली होती. या चोरीचा तपास करत असताना पोलिसांना एम. के. हुबळी येथील पारीशवाड क्रॉसजवळ एक संशयास्पद दुचाकी आढळली. या दुचाकीला नंबरप्लेट नसल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी दुचाकीवरून जात असलेल्या नारायण कदम याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली.

सुरुवातीला साधी वाटणारी ही चौकशी पुढे गेल्यानंतर दुचाकी चोरीच्या मोठ्या मालिकेचा पर्दाफाश झाला. पोलिसांच्या चौकशीत नारायणने गेल्या दोन वर्षांत विविध ठिकाणांहून दुचाकी चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

 belgaum

कित्तूर, हिरेबागेवाडी, संकेश्वर, कलघटगी, यल्लापूर, सवदत्ती, गरग, कुंदगोळ, हळियाळ, काकती, अंकलगी, लक्ष्मेश्वर, धारवाड ग्रामीण आणि हुबळी उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी चोरी झाल्याचे तपासात उघड झाले.

या कारवाईत पोलिसांनी तब्बल ४३ मोटारसायकली जप्त केल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे ३० लाख रुपये असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जप्त दुचाकींपैकी २५ बेळगाव जिल्ह्यातील, ८ बेळगाव पोलीस आयुक्तालय हद्दीतील, ६ धारवाड जिल्ह्यातील, २ गदग जिल्ह्यातील, २ उत्तर कन्नड जिल्ह्यातील तर १ दुचाकी हुबळी-धारवाड आयुक्तालय हद्दीतील असल्याचे समोर आले आहे.

दुचाकी चोरी करून त्या नेमक्या कुठे आणि कशा पद्धतीने वापरल्या जात होत्या, त्यामागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

या प्रकरणाचा तपास बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर. बी. बसरगी आणि बैलहोंगलचे डीवायएसपी डॉ. वीरय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. कित्तूरचे सीपीआय शिवरानंद बी. गुडगनट्टी, पीएसआय भरत एस., पीएसआय जी. जी. हंडण्णवर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

एका नंबरप्लेटविना दुचाकीपासून सुरू झालेला संशयाचा धागा थेट ४३ चोरीच्या दुचाकींपर्यंत पोहोचला. त्यामुळे निडगलचा नारायण कदम हा केवळ एका चोरीचा आरोपी नसून आंतरजिल्हा दुचाकी चोरीच्या मालिकेतील महत्त्वाचा आरोपी असल्याचे या तपासातून स्पष्ट झाले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.