बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये सतीश जारकीहोळी यांनी उपमुख्यमंत्रिपदाच्या चर्चेसह मंत्रिमंडळ विस्तार आणि कावेरी पाणीप्रश्नावर महत्त्वाचे वक्तव्य केले. हायकमांडचा निर्णय अंतिम असेल, असे स्पष्ट करत त्यांनी दुष्काळाच्या मुद्द्यावरून विरोधकांचे आरोपही फेटाळून लावले.
बेळगावमध्ये माध्यमांशी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले. उपमुख्यमंत्रिपदासाठी आपण कोणताही दबाव टाकलेला नसून, पक्षाच्या हायकमांडचा निर्णय अंतिम असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या खात्यात बदल करण्याबाबतही कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना १३ ऑगस्टपूर्वी विस्तार होणार असल्याचे जारकीहोळी यांनी सांगितले. पक्षात याबाबत कोणतीही अस्पष्टता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळाच्या परिस्थितीवरून भाजपकडून सरकारवर होत असलेल्या टीकेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. सरकार दुष्काळाच्या परिस्थितीबाबत गंभीर असून, आपण एरगट्टी, सवदत्ती आणि रामदुर्ग तालुक्यांचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. कावेरी पाणीप्रश्नावरून कर्नाटक बंदची सध्या गरज नसल्याचे जारकीहोळी म्हणाले. तमिळनाडूला आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी सोडण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी मंत्री नागेंद्र यांच्या प्रकरणावरही त्यांनी भाष्य केले. एसआयटी चौकशीत अद्याप कोणतेही आरोप सिद्ध झालेले नसून, न्यायालयाच्या परवानगीनंतरच पक्षाने निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच महिला प्रतिनिधित्वासाठी प्रलंबित असलेल्या एका जागेसाठी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नावाचा विचार व्हावा, असे त्यांनी सुचवले.





