belgaum

महापौर, उपमहापौरांची शासकीय वाहने काढून घ्या…

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या मुख्यालयात कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांसमोर आक्रमक भूमिका घेत महापौर आणि उपमहापौरांना देण्यात आलेली शासकीय वाहने व इतर सरकारी सुविधा तातडीने काढून घेण्याची मागणी केली. यासंदर्भात संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना निवेदन सादर केले.

महापौर आणि उपमहापौरांकडून महापालिका क्षेत्राच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. जनतेच्या पैशातून उपलब्ध करून दिलेल्या शासकीय वाहनांसह विविध सुविधांचा वापर केला जात असताना शहराच्या विकासासंदर्भात आवश्यक ती भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

याशिवाय, महापौर आणि उपमहापौर यांचे महाराष्ट्र एकीकरण समितीशी (MES) संबंधित विचारसरणीशी जवळीक असल्याचा आरोपही कन्नड संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला. कर्नाटकच्या सुविधांचा लाभ घेत असताना राज्याच्या हिताच्या विरोधात भूमिका घेतली जात असल्याचा दावा आंदोलकांनी केला.

 belgaum

आंदोलनादरम्यान महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. गेल्या तीन महिन्यांपासून महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा झालेली नसल्याचा आरोप करत, त्यामुळे शहरातील अनेक विकासकामे आणि महत्त्वाचे निर्णय रखडल्याचे आंदोलकांनी म्हटले.

महापालिका आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कर्नाटक सरकारला अहवाल पाठवावा, अशी मागणी संघटनांनी केली. विद्यमान महापालिका मंडळ बरखास्त करावे किंवा महापौर आणि उपमहापौरांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

महापौर-उपमहापौरांच्या भूमिकेमुळे कन्नडिगांचा अपमान होत असल्याचा आरोप करत संघटनांच्या नेत्यांनी प्रशासनाला कठोर कारवाईचा इशारा दिला. त्यामुळे बेळगाव महानगरपालिकेतील भाषिक आणि राजकीय वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.