belgaum

चारवेळा महापौर…संभाजी पाटलांचीआजही चर्चा!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेच्या राजकारणात बेळगाव महापालिकेच्या विकासात आणि बेळगाव महापालिकेच्या इतिहासात किंगमेकर अशी भूमिका बजावलेले चार वेळा माजी महापौर पद भूषवलेले दिवंगत माजी आमदार संभाजी पाटील यांच्या विकास कामाची यांच्या कार्याची अनेक उदाहरणे आजही बेळगाव महापालिकेत दिली जातात.

बेळगाव महापालिकेतील विद्यमान महापौर आणि उपमहापौरांना देण्यात आलेली शासकीय वाहने काढून घेण्याच्या मागणीसाठी कन्नड संघटनांनी गुरुवारी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी कन्नड कृती समितीचे नेते अशोक चंदरगी यांनी आपल्या मागणीच्या समर्थनार्थ दिवंगत माजी आमदार व माजी महापौर संभाजी पाटील यांच्या कार्यकाळातील एका महत्त्वपूर्ण घटनेचा दाखला दिला.

महापालिका राजकारणात महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते म्हणून सक्रिय असलेल्या संभाजी पाटील यांनी 1991साली शहराच्या पाणीप्रश्नासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एस. बंगारप्पा यांच्याशी केलेल्या पाठपुराव्याचा संदर्भ चंदरगी यांनी दिला. हिडकल धरणातून बेळगावला पाणी आणण्याच्या योजनेसाठी संभाजी पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी आठवण करून दिली. बेळगावच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात दिवंगत मुख्यमंत्री एस बंगारप्पा सत्कार केला होता त्यांच्याकडून हिडकल पाणी योजनेसाठी 25 कोटींचा निधी मिळवुन घेतला होता आणि ते पाणी बेळगावला आणण्यात मोलाची भूमिका निभावली होती.

 belgaum

विशेष म्हणजे, संभाजी पाटील यांच्या राजकीय भूमिकेशी वैचारिक मतभेद असलेल्या कन्नड संघटनेच्या नेत्यानेच त्यांच्या विकासकामाचा दाखला दिल्याने या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे.

चंदरगी यांनी महापौर आणि उपमहापौरांच्या शासकीय वाहनांच्या वापरावर प्रश्न उपस्थित करताना, भूतकाळातील लोकप्रतिनिधींनी शहराच्या विकासासाठी शासनाकडून सुविधा आणि निधी मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची तुलना आजच्या परिस्थितीशी केली.

संभाजी पाटील यांनी बेळगाव महापालिकेचे चार वेळा महापौरपद भूषवले होते. महापालिका राजकारणातील त्यांचा दीर्घ अनुभव आणि शहरातील विविध प्रश्नांवर त्यांनी केलेला पाठपुरावा यामुळे त्यांचे नाव बेळगावच्या स्थानिक राजकारणात महत्त्वाचे मानले जाते.

मात्र, सध्याच्या घटनेत संभाजी पाटील यांच्या कार्याबाबत कोणतेही राजकीय मूल्यमापन करण्यापेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे कन्नड संघटनेच्या नेत्यानेच त्यांच्या कार्यकाळातील विकासकामाचा संदर्भ देत त्यांचे उदाहरण महापालिका आयुक्तांसमोर मांडले.

हिडकलच्या पाण्याचा प्रश्न असो किंवा महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी शासनदरबारी केलेला पाठपुरावा असो, संभाजी पाटील यांच्या कार्याचा हा संदर्भ आता पुन्हा चर्चेत आला आहे.राजकीय भूमिका वेगवेगळ्या असल्या, तरी शहराच्या विकासासाठी केलेल्या कामाची दखल विरोधी विचारांच्या नेत्याकडून घेतली जाणे—हीच या घटनेची सर्वात लक्षवेधी बाब ठरली आहे.

महापालिकेत अनेक लोकप्रतिनिधी आले आणि गेले. आजही अनेक लोकप्रतिनिधी बेळगावच्या विकासाच्या गोष्टी करत आहेत. मात्र, महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी संभाजी पाटील यांनी केलेल्या कामांची बरोबरी आजवर कोणीही करू शकलेले नाही, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. विशेष म्हणजे, संभाजी पाटील यांच्या राजकीय भूमिकेला विरोध करणाऱ्या कन्नड संघटनेच्या नेत्यानेच त्यांच्या कार्यकाळातील विकासकामाचा दाखला दिल्याने या जुन्या नेतृत्वाची कार्यक्षमता पुन्हा चर्चेत आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.