belgaum

बेळगाव-धारवाड रेल्वे प्रकल्पासाठी ₹70 कोटी निधी;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कित्तूरमार्गे बेळगाव-धारवाड नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने जमीन संपादनासाठी ₹70 कोटींचा निधी मंजूर केला असून, पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टप्प्याटप्प्याने नुकसानभरपाई जमा करण्यास जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे.

73 किलोमीटर लांबीच्या या रेल्वे प्रकल्पासाठी जमीन संपादन प्रक्रियेमुळे काम रखडले होते. निधी उपलब्ध झाल्याने नुकसानभरपाई वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले की, “सरकारकडून प्राप्त झालेल्या ₹70 कोटींचे वितरण टप्प्याटप्प्याने सुरू आहे. उर्वरित नुकसानभरपाईची रक्कमही लवकरच उपलब्ध होईल आणि सर्व पात्र शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा मोबदला दिला जाईल.”

 belgaum

या रेल्वे प्रकल्पाला केंद्र आणि राज्य सरकारच्या 50:50 खर्च वाटपाच्या तत्त्वावर मंजुरी मिळाली आहे. राज्य सरकारवर जमीन संपादन आणि प्रकल्पाच्या निम्म्या खर्चाची जबाबदारी आहे.

प्रकल्पाची सुरुवातीची अंदाजित किंमत ₹927 कोटी होती. मात्र बांधकाम खर्च, जमीन संपादन आणि विलंबामुळे हा खर्च वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकल्पासाठी इदलहोंग, नागेनहळ्ळी, के. के. कोप्पा, गरलगुंजी, नंदीहळ्ळी आणि हलगीमर्दी या गावांतील जमीन संपादित करण्यात येत आहे. यापूर्वी काही शेतकऱ्यांनी प्रस्तावित मार्गाला विरोध करून पर्यायी मार्गाची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने चर्चा करून संपादन प्रक्रिया पुढे नेली.

प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बेळगाव ते धारवाड दरम्यान कित्तूरमार्गे थेट रेल्वे संपर्क उपलब्ध होणार असून, सध्याच्या लोंढामार्गे होणाऱ्या प्रवासाच्या तुलनेत वेळेची मोठी बचत होणार आहे. भविष्यात वंदे भारतसारख्या वेगवान रेल्वेगाड्या धावण्यासाठीही हा मार्ग उपयुक्त ठरणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

सध्या प्रशासनाचे लक्ष उर्वरित नुकसानभरपाई वाटप पूर्ण करून संपादित जमीन रेल्वे विभागाकडे सुपूर्द करण्यावर असून, त्यानंतर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.