बेळगाव लाईव्ह : एका भरधाव कारच्या बेफाम वेगामुळे बैलहोंगळ तालुक्यातील दोन मेंढपाळांचे लाखो रुपयांचे संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाले. जालिकोप्प गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात ४८ हून अधिक मेंढ्यांचा मृत्यू झाला, तर १५ हून अधिक मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
बैलहोंगळहून बेलवडीकडे भरधाव वेगाने जाणारी कार रस्ता ओलांडत असलेल्या मेंढ्यांच्या कळपावर चढली. क्षणार्धात रस्त्यावर मृत मेंढ्यांचा खच पडला, तर जखमी मेंढ्या वेदनेने तडफडत होत्या. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत झालेल्या मेंढ्या केंगानूर येथील चंद्रप्पा हित्तलमनी आणि दोडवाड येथील बीरप्पा यांच्या मालकीच्या असल्याचे समजते. या अपघातामुळे त्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, अनेक गाभण मेंढ्यांचाही मृत्यू झाल्याने नुकसान अधिक वाढले आहे.

अपघातानंतर कारचालकाने वाहन घटनास्थळीच सोडून पलायन केले. संतप्त ग्रामस्थांनी निष्काळजी वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच बैलहोंगळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. फरार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध सुरू आहे.





