belgaum

तिलारीचे अतिरिक्त पाणी बेळगावला..शेट्टरांचे फडणवीसांना पत्र

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहराच्या कायमस्वरूपी पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी खासदार तथा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पांतर्गत तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी राकसकोप्प जलाशयाकडे वळविण्याची मागणी केली आहे.

२५ जुलै २०२६ रोजी पाठविलेल्या पत्रात शेट्टर यांनी बेळगाव महानगरपालिकेचे माजी महापौर शिवाजी सुंठकर तसेच इतर माजी नगरसेवकांनी सादर केलेल्या निवेदनाचा उल्लेख केला आहे. या निवेदनाची प्रतही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठविली आहे.

पत्रात नमूद केल्याप्रमाणे, बेळगाव शहराला दरवर्षी उन्हाळ्यात राकसकोप्प आणि हिडकल धरणांतील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.

 belgaum

यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राकसकोप्प जलाशयात वळविण्याची योजना राबविण्यात यावी, अशी मागणी शेट्टर यांनी केली आहे. तिलारी आणि राकसकोप्प हे जलस्रोत भौगोलिकदृष्ट्या जवळ असल्याने हा प्रस्ताव व्यवहार्य ठरू शकतो, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

राकसकोप्प जलाशय हा बेळगाव लोकसभा मतदारसंघात येत असल्याचे नमूद करत, शहराच्या वाढत्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा लक्षात घेऊन या प्रस्तावाबाबत सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक ती कार्यवाही सुरू करावी, अशी विनंती शेट्टर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.

या पत्राची प्रत कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज, चंदगडचे आमदार शिवाजी सातुपा पाटील आणि बेळगावचे माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनाही माहितीसाठी पाठविण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात बेळगाव माजी नगरसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी राकसकोप्प जलाशयाकडे वळविण्याच्या मागणीबाबत सविस्तर चर्चा केली होती. या बैठकीत संघटनेने यासंदर्भातील निवेदन खासदारांना सादर केले होते. त्यानुसार खासदार शेट्टर यांनी या मागणीची दखल घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पांतर्गत तिलारीचे अतिरिक्त पाणी राकसकोप्प जलाशयाकडे वळविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.