बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या आठ साहसी युवकांनी जगातील सर्वात उंच मोटरेबल रोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमलिंग ला (Umling La) या दुर्गम आणि आव्हानात्मक ठिकाणी यशस्वीरीत्या पोहोचून भारतीय तिरंगा अभिमानाने फडकावला. समुद्रसपाटीपासून तब्बल 19,024 फूट उंचीवर तिरंगा फडकावत त्यांनी देशभक्ती आणि साहसी वृत्तीचा प्रेरणादायी संदेश दिला.
लडाखमधील उमलिंग ला हा जगातील सर्वाधिक उंचीवरील मोटरेबल रोड म्हणून प्रसिद्ध आहे. विरळ हवा, अत्यंत कमी तापमान, ऑक्सिजनची कमतरता आणि कठीण हवामान अशा अनेक आव्हानांवर मात करत बेळगावच्या युवकांनी हे ध्येय गाठले. या प्रवासासाठी त्यांनी शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक तयारी आणि नियोजन यांचा कस लावला.
उमलिंग ला येथे पोहोचल्यानंतर सर्व युवकांनी भारतीय राष्ट्रध्वज फडकावत देशाप्रती असलेले प्रेम आणि अभिमान व्यक्त केला. त्या उंच शिखरावर तिरंगा फडकताना अनुभवलेला क्षण आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “हा प्रवास केवळ साहसाचा नव्हता, तर जिद्द, चिकाटी, संघभावना आणि स्वप्न पूर्ण करण्याच्या इच्छाशक्तीचा प्रवास होता. एवढ्या उंचीवर देशाचा तिरंगा फडकवण्याचा सन्मान मिळणे ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.”
या साहसी मोहिमेत किरण गोरल, विनायक चौगुले, प्रसन्न चौगुले, ऋषिकेश जाधव, किरण कदम पाटील, नितीन चव्हाण, श्रीशांत चव्हाण आणि सुरज भोसले यांनी सहभाग घेतला. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, बेळगावच्या युवकांसाठी त्यांनी साहस आणि देशप्रेमाचा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.





